संतांनी काळानुसार समाजाला मार्गदर्शन केले आहे. समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण अन धर्मजागृती’ यांविषयी मार्गदर्शन केले आहे. त्यांची शिकवण मला साधनेच्या मार्गावरील दीपस्तंभासारखी आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली आणि ते ती आम्हा साधकांकडून करवून घेत आहेत. संतांचे चैतन्यमय मार्गदर्शन परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती केल्यावर मला पुढीलप्रमाणे अनुभवायला मिळत आहे.
१. समर्थ म्हणती,
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनि पाहे ।।
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ।।
– मनाचे श्लोक, श्लोक ११
परम पूज्य (टीप १) वदती,
जगी सर्व साधक आनंदी आहेत ।
गुरुकृपायोगानुसार साधना करूनी तू पाहे ।।
गुरुकृपेने संचित उणावले ।
गुरुप्राप्तीने भोग सुसह्य झाले ।।
२. समर्थ म्हणती,
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ।।
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ।।
– मनाचे श्लोक, श्लोक १६
परम पूज्य वदती,
देह त्यागिता साधकांना सद्गती मिळत आहे ।
साधना केल्याने साधकांना आनंद मिळत आहे ।।
साधना करूनी साधक प्रगती करत आहेत ।
तेही जन्म-मरणाच्या फेर्यांतून सुटत आहेत ।।
३. समर्थ म्हणती,
समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।
– मनाचे श्लोक, श्लोक ३०
परम पूज्य वदती,
सनातनच्या साधकां वक्र पाहे ।
असा तिन्ही लोकी कोण आहे ।।
जयाची लीलागान होते साधकजनी ।
नुपेक्षी कदा श्रीविष्णु (टीप २) साधकाभिमानी ।।
४. समर्थ म्हणती,
सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।
– दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६
परम पूज्य वदती,
सामर्थ्य आहे हिंदु धर्माचे । जो जो धर्मरक्षण करील तयांचे ।।
परंतु तेथे गुरुकृपेचे । अधिष्ठान पाहिजे ।।
५. समर्थ म्हणती,
धर्माकरिता मरावे ।
मरोनि अवघ्यांस मारावे ।।
मारिता मारिता घ्यावे ।
राज्य आपुले ।।
(साभार : समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना केलेला उपदेश)
परम पूज्य वदती,
धर्मसेवा साधन म्हणूनी करावे ।
‘धर्माे रक्षति रक्षितः।’ (टीप ३) अनुभवावे ।।
हिंदु राष्ट्र येणार आहे ईश्वरेच्छेने ।
साधना करूनी त्यासी पात्र व्हावे ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
टीप २ – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले आहे.
टीप ३ – धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.१२.२०२०)