गोशाळेकडून गायींविषयी अशा प्रकारचा हलगर्जीपणा होत असेल, तर अशांच्या संचालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच असे मध्यप्रदेशातील अन्य गोशाळांमध्ये होत नाही ना ? याची पहाणी केली पाहिजे ! – संपादक
भोपाळ (मध्यप्रदेश) – भोपाळ जिल्ह्यातील बैरसिया या गावातील एका गोशाळेजवळ गायींचे मृतदेह आणि सांगाडे सापडले आहेत. ही संख्या १०० हून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर गोशाळेजवळ काही हिंदु संघटनांनी निषेध मोर्चा काढून गोशाळा संचालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
गोशाळा संचालिकेच्या विरोधात तक्रारीचा आदेश !
भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी बैरसिया गावात येऊन घटनास्थळाची पहाणी केली आणि गोशाळेच्या संचालिका निर्मला शांडिल्य यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्याचा आदेश दिला. तसेच सध्या जिल्हा कार्यकारी अधिकार्यांना गोशाळेच्या संचालनाचे दायित्व देण्यात आले आहे.
लवानिया यांनी सांगितले की, गायींच्या मृतदेहांच्या विल्हेवाटीत निष्काळजीपणा करण्यात आल्याचे दिसून आले आहे. गायींच्या मृतदेहाची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने करावी लागते; मात्र येथे असे न करता त्यांना उघड्यावर फेकून देण्यात आले. ते अत्यंत अशोभनीय आहे. ज्या गायींचा नुकताच मृत्यू झाला आहे, त्यांचे शवविच्छेदन चालू आहे.
MP: Several cows found dead near Bhopal; cowshed management booked#Bhopal #MadhyaPradeshhttps://t.co/mSJ8lltqp1
— India TV (@indiatvnews) January 31, 2022
काँग्रेसकडून भाजपवर टीका
काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी आरोप केला की, गोशाळेच्या संचालिका निर्मला शांडिल्य या भाजपच्या नेत्या आहेत. भोपाळ जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शांडिल्य यांच्या गोठ्यात गायींची हाडे आणि चामड्याचा व्यापार चालू होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात गोहत्येची तक्रार नोंदवण्यात यावी, गायीच्या हाडांच्या व्यापाराची चौकशी करावी आणि गेल्या काही वर्षांत गोशाळेला जे अनुदान मिळाले, त्याचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी सिंह यांनी शासनाकडे केली आहे.