धर्मांतरासाठी दबाव आणल्यामुळे आत्महत्या केलेल्या लावण्या या हिंदु विद्यार्थीनीची व्यथा व्हिडिओद्वारे उघड

मला अभ्यास करू न देता वसतीगृहात काम करायला लावले !

या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई होणे हिंदूंना अपेक्षित आहे ! – संपादक

चेन्नई – तमिळनाडूतील तंजावूरमध्ये धर्मांतराला नकार दिल्याने कॉन्व्हेंट शाळेने अत्याचार केल्यामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. लावण्याने आत्महत्या करण्यापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तिने ‘मला वसतीगृहात काम करण्यास भाग पाडले गेले आणि अभ्यास करू दिला नाही’, अशी तक्रार केल्यामुळे तिच्या शाळेने बळजोरीने धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे. व्हिडीओमध्ये लावण्याने आरोप केला आहे की,

१. वसतीगृहाच्या महिला ‘वॉर्डन’ (व्यवस्था पहाणारा अधिकारी) समाया मेरी हिने मला हिशोब करायला लावले. मी ‘अभ्यास करायचा आहे’, असे सांगितल्यावर ‘हे काम संपवून मग इतर कामे कर’, असे ती सांगायची. मी हिशोब नीट केला, तरी हिशोब चुकला’, असे ती म्हणायची आणि मला पुन्हा हिशोब करायला लावायची. समाया मेरी हिने मला वसतीगृहाचे गेट बंद करणे आणि उघडणे, पाण्याचा विद्युत् पंप चालू आणि बंद करणे आदी कामे सांगितली.

२. ‘शाळेत बिंदी लावू नये’, असा नियम आहे का’, असे मी तिला विचारले असता तिने असे काही नसल्याचे उत्तर दिले.

३. मला दहावीत प्रथम क्रमांक मिळाला असून मला चांगला अभ्यास करायचा होता; परंतु माझ्यावर सोपवलेल्या कामामुळे मला नीट अभ्यास करता आला नाही. कौटुंबिक समस्यांमुळे मी यावर्षी शाळेत उशिरा प्रवेश घेतला.

४. या सर्व कारणांमुळे मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकले नाही आणि मला अल्प गुण मिळाले. मला ते सहन होत नव्हते; म्हणून मी विष प्यायले.

५. मी आजारी असल्याने शाळेने मला घरी जाऊ दिले. त्या वेळी ‘मी विष प्राशन केले’, हे शाळा व्यवस्थापनाला ठाऊक नव्हते.

६. ‘मला पोंगलसाठी घरी जायचे होते, परंतु अभ्यासाचे कारण देत वॉर्डनने मला जाण्यासाठी अनुमती न देता वसतीगृहातच थांबायला लावले’, असा आरोप लावण्या हिने व्हिडिओमध्ये केला.

व्हिडीओ काढणार्‍याची चौकशी करावी ! – सर्वोच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने लावण्याने मृत्यूच्या काही दिवस आधी तिने केलेल्या आरोपांच्या व्हिडीओचे चित्रीकरण करणार्‍या व्यक्तीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आणि चित्रीकरणासाठी वापरलेला भ्रमणभाष जमा करण्याचा आदेश दिला. ‘या घटनेची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी मुलीच्या वडिलांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. याच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला.

कॉन्व्हेंट शाळेने आरोप फेटाळले

या प्रकरणात शाळा व्यवस्थापनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या कोणत्याही धार्मिक श्रद्धांमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. आमची संस्था उपेक्षित आणि जे शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण देण्याच्या एकमेव उद्देशाने ही शाळा १८० वर्षांपासून चालवत आहेत’, असे व्यवस्थापनाने सांगितले.