बिहारमध्ये तरुणांकडून झालेल्या हिंसक आंदोलनाच्या प्रकरणी पटना येथील खान यांच्यासह अन्य शिक्षकांविरूद्ध तक्रार प्रविष्ट !

बिहारमध्ये रेल्वे परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत तरुणांकडून झालेल्या हिंसक आंदोलनाचे प्रकरण

डावीकडून खानसर

पाटलीपुत्र (बिहार) – भारतीय रेल्वेच्या ‘आर्.आर्.बी.-एन्.टी.पी.सी.’ आणि ‘ग्रुप डी’ परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत तरुणांनी प्रजासत्ताकदिनी हिंसक आंदोलन केले. या प्रकरणी पटना येथील शिक्षक खान यांच्यासह अन्य शिक्षकांविरूद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांनी तरुणांना हिंसक न होण्याचे आवाहन केले आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी एका समितीचीही स्थापना केली आहे.

गयामध्ये आंदोलक तरुणांनी दगडफेक करत भभुआ-पाटणा इंटरसिटी एक्सप्रेसला आग लावली. अनेक ठिकाणी आंदोलन करणार्‍या तरुणांवर पोलिसांनीही लाठीमार केला. या प्रकरणी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना कह्यात घेतले होते. खान यांच्यासह एस्.के झा सर, नवीन सर, अमरनाथ सर, गगन प्रताप सर, गोपाल वर्मा सर आणि अन्य शिकवणी वर्ग यांच्यावर आंदोलक तरुणांना चिथावणी दिली, असे तक्रारित म्हटले आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण केले जाईल, तसेच आरोपींना त्यांचे मत मांडण्यास दिले जाईल, असे जिल्हा दंडाधिकार्‍यांनी म्हटले आहे.