बांगलादेश सीमेवरील पशू तस्करीचा मुख्य सूत्रधार असणार्या इनामुल हक याला जामीन संमत
नवी देहली – कोणत्याही व्यक्तीला ‘राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरेल’, या शक्यतेच्या आधारावर अनिश्चित कालावधीसाठी कारागृहात डांबून ठेवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ‘अन्वेषण यंत्रणांकडून ‘मोठ्या कटाची योजना’ या कारणाखाली पुराव्यांविना शक्यतांच्या आधारे एखाद्या व्यक्तीला कारागृहात ठेवता येणार नाही’, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सीमेपलीकडून पशू तस्करीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी महंमद इनामुल हक याला जामीन संमत करतांना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
Can’t keep someone in jail indefinitely over national security fears: Supreme Court https://t.co/IHsxgZwEHP
— TOI India (@TOIIndiaNews) January 24, 2022
१. या प्रकरणामध्ये अन्वेषण यंत्रणांना सीमा सुरक्षा दलाच्या एका कमांडरलाही त्याच्या कथित सहभागासाठी अटक केली होती. पशू तस्करीमधून मिळालेले पैसे राजकीय पक्ष आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी यांना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
२. सीबीआयच्या अधिवक्त्यांनी ‘या नियोजित कटाची चौकशी प्रलंबित असून ती चालू आहे’, असे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने, ‘ही अशी कोणती चौकशी केली जात आहे, जी आम्हाला समजत नाही ? अन्वेषण करतांना अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला अनिश्चित कालावधीसाठी कह्यात घेऊन अन्वेषणात काय लाभ होतो ? विशेष म्हणजे अन्य व्यक्तींना जामीन संमत करण्यात आलेला असतांना या प्रकरणामधील संबंधित व्यक्ती ही मागील १४ मासांपासून कारागृहामध्ये आहे. मोठ्या कटाचे अन्वेषण करण्यासाठी हा कालावधी पुरेसा नाही का ?’, असा प्रश्न उपस्थित केला.
३. इनामुल हक याचे अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद करतांना म्हटले की, सीबीआयकडून पशू तस्करीच्या प्रकरणामध्ये ६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या कमांडरसहीत अन्य आरोपींना न्यायलयाने जामीन संमत केला; मात्र कोलकाता उच्च न्यायालयाने इनामुल हक याला जामीन दिला नाही. या प्रकरणामध्ये सर्वाधिक शिक्षा ७ वर्षांपर्यंत असू शकते. त्यामुळेच एका वर्षाहून अधिक कालावधीसाठी जामीन नाकारणे चुकीचे आहे.
इनामुल हक पशू तस्करीचा मुख्य सूत्रधार ! – सीबीआय
सीबीआयच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, इनामुल हक पशू तस्करीचा मुख्य सूत्रधार आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या लोकांसमवेतच, सीमा शुल्क अधिकारी, स्थानिक पोलिसांसमवेतच अन्य व्यक्तीही सहभागी आहे. इनामुल हक बांगलादेशमार्गे बंगालमध्ये पोचला. यावरून इनामुल हक आणि स्थानिक पोलीस यांच्यामध्ये लागेबांधे आहेत. याच कारणामुळे तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरू शकतो..