संभाजीनगर येथे सेवा करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. चैताली डुबे यांची त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
लेखिका – सौ. छाया गणेश देशपांडे
१. सकारात्मक आणि समंजस : ‘कु. चैतालीताई नेहमी सकारात्मक असते. ती इतरांना समजून घेते आणि आवश्यक असेल, तेव्हा साधकांना साहाय्यही करते. एखादा साधक बैठकीला आला नाही, तर चैतालीताई त्याची अडचण समजून घेऊन त्याला योग्य उपाययोजना सांगते.
२. आधार वाटणे : चैतालीताई वयाने आमच्यापेक्षा लहान असूनही आम्हाला तिचा आधार वाटतो. संभाजीनगरमध्ये पुष्कळ वयस्कर साधक आहेत. ती त्यांची विचारपूस करते आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलते. त्यामुळे ताई आम्हा सर्वांनाच हवीहवीशी वाटते.
३. इतरांची काळजी घेणे : एखादा साधक रुग्णाईत असेल, तर ती त्याला लगेच साहाय्य करते. ती आमची सर्व प्रकारे काळजी घेते. आम्हाला सेवा देतांना ती आमच्या प्रकृतीनुसार देते आणि ‘त्या सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करू शकतो ?’, हेही सांगते.
४. सेवेची तीव्र तळमळ
४ अ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी चैतालीताईने तळमळीने केलेल्या सेवा
४ अ १. तहान, भूक, झोप सर्वकाही विसरून झोकून देऊन सेवा करणे : ९.२.२०२० या दिवशी जालना येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या १ ते ३ मास आधीपासून ताई जवळपास दिवसभर ‘प्रसार, सभेच्या व्यासपिठाची पूर्वसिद्धता, मैदान आणि साहित्य मिळवणे, अर्पणासाठी संपर्क करणे अन् संध्याकाळी ग्रामीण भागात जाऊन नियोजन करणे’, अशा सेवा अखंड आणि तळमळीने करत होती. तिला तहान, भूक आणि झोप यांचेही भान राहिले नव्हते. सभेचे २ दिवस ती न खाता-पिता मैदानात सेवा करत होती. ती एकाच वेळी अनेक सेवा करते.
४ अ २. सर्वांना सेवेत सहभागी करून घेण्याची तळमळ असणे : सभेच्या वेळी ‘गावातील, जिल्ह्यातील आणि प्रासंगिक सेवा करणार्या साधकांनासुद्धा सेवा मिळावी’, यासाठी ती स्वतः लक्ष ठेवून तळमळीने प्रयत्न करत होती.
४ अ ३. साधकांना सेवेसाठी उद्युक्त करणे : साधकांना सेवेसाठी उद्युक्त करण्यासाठी ती जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन सत्संग घेत होती आणि त्यांना सेवेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी नियोजन करत होती.
४ आ. जिल्ह्यातील साधकांच्या साधनेची आणि सेवेची घडी बसवणे
१. ‘जिल्ह्यातील सर्व साधकांची व्यष्टी साधना व्यवस्थित व्हावी’, यासाठी तिने नियमित आढावा चालू केला आणि ‘साधकांनी आढावा द्यावा’, यासाठी ती लक्ष देऊन तळमळीने प्रयत्न करते. त्यासाठी ती साधकांचा ‘ऑनलाईन’ आढावा घेते.
२. ती साधकांना सकारात्मकतेने आणि स्पष्टपणे चुका सांगते. त्याच समवेत ती साधकांच्या चांगल्या प्रयत्नांचे कौतुकही करते.
५. भाव
अ. तिने अगदी अल्प कालावधीत गुरुपौर्णिमा शिबिराचे आयोजन पुष्कळ सुंदर आणि भावपूर्ण केले.
आ. तिच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ती भावप्रयोग भावपूर्णरित्या घेते. त्यामुळे साधकांचाही भाव वाढायला साहाय्य होत आहे.
६. कु. चैतालीताईमध्ये जाणवलेले पालट
अ. चैतालीताईचा तोंडवळा नेहमी हसरा असतो. ती सतत उत्साही असते.
आ. चैतालीताईमधील प्रेमभाव वाढला आहे. आता ती सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने बोलते. ती साधकांशी जवळीक साधते.
इ. तिचा ‘इतरांकडून अपेक्षा करणे’ हा स्वभावदोष पुष्कळ न्यून झाला आहे. तिचे तत्परतेने कृती करण्याचे आणि सहजतेने साधकांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न वाढले आहेत.
ई. तिचा भाव फार वाढला असून कर्तेपणा देवाला अर्पण करण्याचे प्रयत्नही वाढले आहेत.
उ. ताईची व्यापकताही वाढली असून साधक सिद्ध करण्याचे तिचे प्रयत्नही वाढले आहेत.
७. चैतालीताईची गुरुमाऊली पुरवील आस ।
शिखरे उत्कर्षाची सर तू करावी । कधी मागे वळून पहाता ।
आमची (सनातन परिवाराची) शुभेच्छा स्मरावी ।। १ ।।
मूर्ती लहान; पण कीर्ती महान । असे तुला गुरुकृपा संपादन करण्याचा ध्यास ।
गुरुमाऊली पुरवील तुझी आस ।। २ ।।
(वरील सर्व सूत्रांचा दिनांक ९.३.२०२०)
लेखिका : सौ. राजेश्री कुलकर्णी, संभाजीनगर
१. चैतालीताई नेहमी प्रसन्न आणि हसतमुख असते.
२. समाधानी : ती मायेत किंवा नातेवाइकांत अडकत नाही. तिच्या आवश्यकता (गरजा) अल्प झाल्या असून तिची समाधानी वृत्ती वाढली आहे.
३. तत्त्वनिष्ठ
अ. ती आमच्यापेक्षा वयाने लहान असूनही कौटुंबिक प्रसंगात तटस्थ राहून दृष्टीकोन देते आणि भावनेत न अडकता स्पष्टपणे सांगते.
आ. क्रियाशील साधक तिच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. ती साधकांना त्यांच्या प्रकृतीप्रमाणे सेवा सांगते आणि सेवेचा पाठपुरावाही घेते.
४. भाव : तिच्याशी ५ मिनिटे बोलले, तरी मला चांगले वाटते आणि माझ्यातील सकारात्मकता वाढते.
५. साधनेच्या प्रयत्नांत वाढ होणे : तिचे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे गांभीर्य अन् तळमळ वाढली आहे. तिचा आत्मविश्वास आणि भावाच्या स्तरावरचे प्रयत्न वाढले आहेत.
लेखिका : सौ. अनिता रंधे, संभाजीनगर
१. ‘चैतालीताई संभाजीनगरची आई आहे’, असे वाटते. ती वयाने लहान असूनही सर्वांच्या अडचणी सोडवते.
२. ती स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेते. त्यात ती सर्वांना सहभागी करून घेते आणि ‘प्रयत्न कसे करायचे ?’, हे सहजतेने सांगते. ताईमध्ये पुष्कळ पालट जाणवत आहे.
३. तिला ‘साधकांची लवकर प्रगती व्हावी’, असे वाटते. त्यासाठी ती प्रत्येक साधकाचे स्वभावदोष अचूक सांगून ते दूर होण्यासाठी साधकांकडून प्रयत्न करवून घेते.’
लेखिका : सौ. फाल्गुनी सराफ, संभाजीनगर
दळणवळण बंदीच्या काळात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे सत्संग घेणे अन् ‘साधकांचे स्वभावदोष लवकर न्यून व्हावेत’, ही तळमळ जाणवणे : ‘चैतालीताई दळणवळण बंदीच्या काळात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे सत्संग घेत असे. तिने सत्संगात माझ्यातील ‘अधिकारवाणीने बोलणे’ या स्वभावदोषाची मला जाणीव करून दिली. माझी आई सौ. रिया सावरिया आणि साधिका सौ. आदिती ठाकूर यांनीही मला याच स्वभावदोषाविषयी सांगितले होते. तेव्हा ‘आदितीने माझ्यातील या स्वभावदोषाविषयी चैतालीताईला सांगितले असावे’, असे मला वाटले; परंतु तिने ताईला त्याविषयी काहीही सांगितले नव्हते, तरी चैतालीताईने माझ्यातील या स्वभावदोषाविषयी सांगितल्यावर मला आश्चर्य आणि कृतज्ञता वाटली. त्या वेळी चैतालीताईत ‘साधकांचे स्वभावदोष लवकर न्यून व्हावेत’, ही तळमळ आणि प्रेमभाव जाणवला. ‘गुरुमाऊली, आमच्या ताईला साधनेत लवकर पुढे न्या आणि आम्हा सर्व साधकांना स्वभावदोष विरहित करा’, हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे.
लेखिका : सौ. सुगला हेगे, संभाजीनगर
‘चैताली डुबे’ या नावाचा भावार्थ
चै – चैतन्याने भारित झालेले सुगंधी फूल गुरुचरणी अर्पण झाले
ता – तारक भाव असून प्रीतीचा झरा निर्माण करणारी
ली – लीन होऊनी एकेक साधक-फूल गुरुचरणी अर्पण करणारी
डु – डुंबून राहून साधनेत सगळ्या साधकांच्या मनातील भाव जाणणारी
बे – बेभान होऊनी गुरुकार्य करणारी
लेखक : श्री. शरद चावडा, संभाजीनगर
‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान’ असणारी चैतालीताई जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याने साधकांचा आनंद द्विगुणित होणे : ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान’ असणारी आमची चैतालीताई आज गुरुचरणी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाली. चैतालीताई गुरुचरणी अर्पण झाली आणि साधकांचा आनंद द्विगुणित झाला. गुरुमाऊलींच्या कृपेने हे झाले, यासाठी त्यांच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता ! (४.६.२०२०)