हिंदूंची क्षमा न मागता केवळ भावनांचा आदर केल्याचे सांगत ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे मागे घेतल्याची केली घोषणा !

‘सारेगामा म्युझिक’ने ट्वीटद्वारे दिली माहिती !

  • ‘सारेगामा म्युझिक’ने कधी अहिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या गीताची निर्मिती केली आहे का ? – संपादक
  • आधी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या आणि त्यानंतर त्यास प्रखर विरोध झाल्यावर माघार घ्यायची, हे नेहमीचेच झाले आहे. हिंदूंकडे कुणी वाकड्या दृष्टीने पाहू धजावणार नाही, अशी पत हिंदू कधी निर्माण करणार ? – संपादक

नवी देहली – ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गीतावर अश्‍लील नृत्य करतांना दाखवून श्रीकृष्णाची निस्सीम भक्त राधेचा अवमान करण्यात आला होता. भारतभरातील हिंदूंनी या विरोधात व्यापक स्तरावर आंदोलन उभारले आणि या गीतावर बंदी आणण्याची मागणी केली होती. या प्रखर विरोधापुढे या गीताचे निर्माते ‘सारेगामा म्युझिक’ नमले असून त्यांनी हे गीत पुढील ३ दिवसांत सर्व माध्यमांवरून हटवले जाईल, असे कळवले आहे. त्यांनी एका ट्वीटद्वारे याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशवासियांच्या भावनांचा आम्हाला आदर असून आम्ही या गीताला मागे घेत आहोत. असे असले, तरी ‘सारेगामा म्युझिक’ने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे हिंदूंची क्षमा मात्र मागितलेली नाही. याविषयी हिंदूंमध्ये रोष आहे.

या गीताला मथुरेतील संतांनीही तीव्र विरोध केला होता. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही हे गीत न हटवल्यास दिग्दर्शक शाकिब तोशी आणि अभिनेत्री सनी लिओनी यांच्या विरोधात कारवाई करण्याचे सूतोवाच केले होते.