निपाणी (जिल्हा बेळगाव), २३ डिसेंबर (वार्ता.) – गायीला ‘राष्ट्रमाता’ घोषित करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही ‘गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा’, असे सांगितले आहे. त्या अनुषंगाने कर्नाटक राज्यानेही गायीला राष्ट्रमाता घोषित करावे, या मागणीचे निवेदन ‘निपाणी गौसेवा कृती समिती’चे मुख्य संयोजक श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली तहसीलदार डॉ. भिसे यांना देण्यात आले.
या वेळी श्रीकृष्ण भावामृत संघ (इस्कॉन), जैन समाज, राजस्थानी समाज, वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्रीराम सेना, बजरंग दल, श्रीराम सेना हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था यांच्यासह अन्य गोप्रेमी उपस्थित होते.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. गाय ही सर्वांत सात्त्विक प्राणी असून प्रत्येक हिंदूसाठी गोमाता पूजनीय आहे. गायीमध्ये ३३ कोटी देवतांचा वास आहे, अशी हिंदु समाजाची धारणा आहे.
२. गायीपासून सिद्ध होणारे पंचगव्य हे सर्वश्रेष्ठ औषध आहे. त्यामुळे गायीचे संगोपन आणि संवर्धन चांगल्या प्रकारे झाले, तर गाय निसर्गालाही उपयुक्त ठरते. गायीच्या शेणापासून अधिकाधिक गोवर्या इंधनासाठी वापरल्या जातील आणि वृक्षतोड थांबेल. पर्यायाने ओझोन वायूच्या प्रमाणात वाढ होईल आणि ही गोष्ट निसर्गाच्या संवर्धनासाठी योग्य ठरील.
३. तरी या गोष्टींचा विचार करून गायीला लवकरात लवकर राष्ट्रमाता घोषित करावे.