अध्यात्म, संस्कृती यांचा विचार घेत भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे ! – पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ संगणकतज्ञ

डॉ. विजय भटकर

पुणे – वैदिक काळापासून भारताने प्रगतीचे अतीउच्च शिखर गाठल्याचे दाखले आपल्याला दिसून येतात. आपली समृद्ध परंपरा, अध्यात्म, संस्कृती यांचा विचार घेत भारताने विश्वगुरूच्या भूमिकेतून जगाचे नेतृत्व करावे. अध्यात्म आणि विज्ञान हे एकत्र आले पाहिजे, ही वैदिक काळापासूनची धारणा वास्तवात आल्यास भारताचे नेतृत्व जगाला मान्य करावेच लागेल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. ‘नॉन रेसिडेंट इंडियन पॅरेंट्स ऑर्गनायझेशन’ अर्थात् ‘नृपो’ संस्थेच्या वतीने डॉ. भटकर यांना ‘नृपो’ संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी डॉ. भटकर पुढे म्हणाले की, एक काळ होता जेव्हा भारतीय शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होणारी बौद्धिक पिढी ‘ब्रेन ड्रेन’च्या (बौद्धिक गळती) माध्यमातून पाश्चात्त्यांच्या प्रगतीत गुंतली होती; परंतु आता माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘ब्रेन गेन’पर्यंत (बौद्धिक क्षमता राखणे) आपला प्रवास झाला आहे. देशात झालेल्या ‘डिजिटल’ क्रांतीमुळे शाळेपर्यंत विद्यार्थी पोचू शकत नसले, तरी विद्यार्थ्यांपर्यंत शाळा पोचत आहे. त्यामुळे अतिशय गतीने परिवर्तन आणि स्थित्यंतर घडून येत आहे.