परीक्षा घेण्याचीच परीक्षा !

संपादकीय

परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्याला आळा घालणे आवश्यक ! 

काही मासांपूर्वी आरोग्य विभागातील विविध पदांसाठी घेतलेल्या परीक्षांमध्ये झालेला प्रचंड सावळागोंधळ महाराष्ट्राला परिचित आहे. परीक्षेच्या पूर्वीच परीक्षेचा पेपर फुटणे, परीक्षा केंद्र पालटल्यावर विद्यार्थ्यांना माहिती न देणे, एका जिल्ह्यातील परीक्षार्थीला लांबच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळणे, एस्.टी.चा संप असल्याने परीक्षा केंद्रांवर विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास न मिळणे, परीक्षा रहित होणे, अपुर्‍या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर आल्यामुळे परीक्षेला विलंब होणे इत्यादी अनेक अडचणी आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये आल्या. त्यामुळे सहस्रो विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. कोरोना संसर्गाच्या प्रकोपामुळे गेले दीड वर्ष आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. या ताणाच्या अनेक कारणांपैकी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नाही, हेसुद्धा आहे. ही गोष्ट लक्षात आल्यामुळे आरोग्य विभागात विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्याचे ठरवण्यात आले; मात्र या परीक्षांमध्ये झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे सरकारच्या आशा धुळीस मिळाल्याप्रमाणे झाले.

पेपरफुटीतील साखळी !

म्हाडा

हा विषय आरोग्य विभागापर्यंतच थांबेल, असे वाटत होते; मात्र तसे न होता ‘म्हाडा’च्या (महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या) पदभरतीच्या परीक्षेतही पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याने ती रहित करण्यात आली. या परीक्षेतील पेपरफुटीचा शोध घेतांना पोलिसांना ‘शिक्षक पात्रता परीक्षे’तही (टी.ई.टी.) घोटाळा झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे राज्यात परीक्षांचा महाघोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सर्वांत कहर म्हणजे ज्यांच्याकडे परीक्षा घेण्याचे दायित्व आहे, त्या ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’चे आयुक्त तुकाराम सुपे यांचाच पेपर फोडण्यात हात असल्याचे पुरावे सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. परीक्षा घेण्याचे ज्यांच्याकडे कंत्राट आहे, त्या ‘जी.ए. सॉफ्टवेअर’च्या डॉ. प्रीतीश देशमुख यांनी १० कंत्राटदारांशी संधान साधून ‘म्हाडा’चा पेपर फोडण्याचा कट रचल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. तुकाराम सुपे, त्यांचे सल्लागार आणि डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या घरांवर पोलिसांनी धाडी घातल्यावर लाखो रुपयांची रोख रक्कम सापडली. तुकाराम सुपे यांच्याकडून गत ३ वर्षे उत्तरपत्रिकेत फेरफार करून उमेदवारांना गुण वाढवून दिले जात होते. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडण्यासाठी सुपे यांना १ कोटी ७० लाख आणि अन्य दोघांना प्रत्येकी सव्वा कोटी रुपये मिळाले आहेत. यावरून पेपर फोडण्याचे केवढे प्रचंड मोठे जाळे कार्यरत आहे आणि पैसे वाटणार्‍यांकडेही कोट्यवधींची माया आहे, हे समजते. ही काही उघड झालेली उदाहरणे आहेत, तर न उघड झालेली किती असतील ? तुपे यांनी गत ३ वर्षांतील परीक्षेचा कबुलीजबाब दिला असला, तरी हे अपप्रकार ३ वर्षांतील नसून ते अनेक वर्षे चालूच असणार, हे कुणीही सांगू शकतो. पेपर फोडण्यासाठी १० दलाल (एजंट) कार्यरत होते. परीक्षा देण्यासाठी पैसे देणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्याचीही आवश्यकता ठेवलेली नव्हती. उत्तरपत्रिका कोर्‍या ठेवून थेट गुण वाढवून देण्यापर्यंत सर्व नियोजन सिद्ध होते, तसेच काहीच परीक्षा केंद्रांवर बनावट विद्यार्थी बसवण्यात आल्याचे पोलिसांकडून समजते.

राज्यात गत काही वर्षांत घेतलेल्या कोणत्याही परीक्षेविषयी आता सत्यता वाटणार नाही, अशी स्थिती आहे. परीक्षा घेण्यात एवढ्या अडचणींचे कारणही भ्रष्ट प्रशासन व्यवस्था आहे, हे जनतेला आता पुरते कळून चुकले आहे. परीक्षा घेणार्‍या व्यवस्थेचा प्रमुख ते एजंटपर्यंत सर्वांचेच हात परीक्षेतील अपप्रकारांमध्ये माखले आहेत, तर जनतेने पहायचे कुणाकडे ? तसेच असे काही होत आहे, याची कुणालाही पुसटशी कल्पना आली नाही कि कल्पना येऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले ? याचीही चौकशी व्हायला हवी.

विद्यार्थ्यांची मानसिकता पालटावी !

काहीही करून परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवणे, हेच विद्यार्थ्याचे उद्दिष्ट राहिल्यास तो पुढे पुन्हा नोकरीच्या ठिकाणी अपप्रकारच करणार ! ही शृंखला चालूच राहून सगळीकडे भ्रष्टाचार करूनच तो मोठ्या पदावर जाणार अथवा नोकरीत येणार. यातून गुणी आणि कष्टाळू विद्यार्थ्यांवर मात्र अन्याय होतो. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथा सांगतांना सांगितले की, परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आईचे दागिने गहाण ठेवून अभ्यास केला; मात्र परीक्षा रहित झाली. त्याचा पुन्हा ताणही आला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा झाल्या; मात्र परीक्षेत निवड होऊनही मुलाखतीचे सत्र अनेक मास रखडल्याने एका गुणवंत विद्यार्थ्याने आत्महत्या करून जीवन संपवले. त्याला लवकरात लवकर अधिकारी बनून जनतेची सेवा करून कर्जफेड करण्यासमवेत घरालाही हातभार लावायचा होता. त्याचे स्वप्न व्यवस्थेमुळे भंगले.

उत्तरप्रदेश मधील परीक्षेत काही पेपर फुटले, तेव्हा योगी सरकारने विद्यार्थ्यांना आश्वस्त करत ‘कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, तसेच पेपर फोडणार्‍यांवर कठोर कारवाई करणार’, असे सांगत प्रशासनाला विनाविलंब पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिले.

खरेतर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय करणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहेच. विद्यार्थी पोटार्थी बनण्याऐवजी ज्ञानार्थी बनला पाहिजे. याचा अर्थ त्याने पैसे कमावू नयेत असे नाही; मात्र जीवनाचे आणि एकूणच मनुष्यजन्माचे ध्येय यांचा विचार केला, तर ते ईश्वरप्राप्ती हे आहे. राष्ट्राच्या प्रगतीचे मूल्यमापन कोण किती शिकला ? राष्ट्र किती श्रीमंत आहे ? यावरून होत नसून ईश्वरप्राप्तीसाठी राष्ट्रातील नागरिकांनी किती पावले टाकली आहेत ? यावरून होत असते. हे मूलभूत ज्ञान शाळा-महाविद्यालयांतून दिल्यास विद्यार्थ्यांचा ओढा प्रामाणिकपणे परीक्षा देण्याकडे राहील.