विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळण्याची व्यवस्था करा ! – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

सिंधुदुर्ग – शालेय पोषण आहार, गणवेश यांपासून विद्यार्थी वंचित आहेतच, त्यातच विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तकेही मिळालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की…

१. एप्रिल २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पोषण आहार शिजवून वितरित करण्यात यावा, असा आदेश दिला.  त्यानंतर शाळा जितके दिवस चालू असेल, तितके दिवस शालेय पोषण आहार शिजवून वितरित करावा, असेही निर्देश दिले आहेत.

२. २२ मार्च २०२० या दिवसापासून कोरोनाच्या संसर्गामुळे देशात दळणवळण बंदी घोषित करून शाळाही बंद करण्यात आल्या. जून २०२१ पासून शैक्षणिक वर्ष चालू झाल्यावर जुलै २०२१ मध्ये शाळाना केवळ तांदूळ आणि २ प्रकारची कडधान्ये पुरवण्यात आली. त्या वेळी शाळा बंद असल्याने उपलब्ध झालेला तांदूळ आणि कडधान्ये यांचे लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांद्वारे शिक्षकांनी वितरित केले.

३. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीच्या सुटीनंतर शाळा नियमित चालू झाल्या आहेत. ऑगस्ट २०२१ पासून गेले ४ मास शाळांना शालेय पोषण आहार पुरवला गेला नाही. त्यामुळे शाळेत उपस्थित रहाणार्‍या लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळेत पोषण आहार शिजवून वितरित करता येत नाही.

४. विद्यार्थ्यांच्या हिताची ही कल्याणकारी योजना बंद असल्याने विद्यार्थ्यांचे पालक शिक्षकांकडे सतत विचारणा करत आहेत. तालुक्यातील शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी याविषयी कोणतेही मार्गदर्शन केलेले नाही.

५. शाळेत उपस्थित रहाणार्‍या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी घरच्या परिस्थितीमुळे अर्धपोटी किंवा उपाशीपोटी रहात असल्याने अध्ययन-अध्यापन यांत त्यांचे लक्ष टिकून रहात नाही. त्यामुळे त्याचा परिणाम शिक्षण प्रक्रियेवर होत आहे.

६. शाळांना पूर्ववत् शालेय पोषण आहार परवठा चालू होण्यासाठी आपल्या (प्रशासकीय) स्तरावरून पाठपुरावा करण्यात यावा. शैक्षणिक वर्ष चालू होऊन ५ मास (महिने) उलटून गेले. आता इयत्ता पहिलीपासूनचे सर्व वर्ग चालू झाले आहेत; मात्र दरवर्षी एप्रिल-मे या मासांत विद्यार्थ्यांना गणवेशासाठी दिले जाणारे अनुदान अद्याप न दिल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.