हिंदुत्वाला वाचवण्यासाठी राष्ट्रीय बाणा जिवंत ठेवून राष्ट्रातील जनतेने जागे राहिले पाहिजे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

श्री. देवेंद्र फडणवीस

ठाणे, ५ डिसेंबर (वार्ता.) – राज्य सरकारसमवेत सत्तेत असलेले काही जण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लांच्छन लावत आहेत. हिंदुत्वाला वाचवायचे असेल, तर राष्ट्रीय बाणा जिवंत ठेवून संपूर्ण राष्ट्रातील जनतेने जागे राहिले पाहिजे, असे विधान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली येथे केले. २ डिसेंबर या दिवशी ज्येष्ठ प्रवचनकार, तसेच व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून उपस्थित असतांना फडणवीस बोलत होते. या वेळी बोलतांना सत्कारमूर्ती शेवडे यांचे वडील भारताचार्य सु.ग. शेवडे म्हणाले, ‘‘आयुष्यात आपल्याच विचारांचा धागा घेऊन जाणारा मुलगा मिळणे यासारखे भाग्य नाही.’’

कार्यक्रमप्रसंगी व्यासपिठावर केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भारताचार्य सु.ग. शेवडे, पै लायब्ररीचे पुंडलिक पै आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संदीप घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘सावरकरांविषयी जाज्वल्य अभिमान असल्याचा आव आणत जे लोक सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत होते, त्या वेळी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले सावरकरांवर लांच्छनास्पद आरोप होत असतांना ते तोंडावर बोट ठेवून बसले होते. त्यामुळे त्यांना आता हिंदुत्वाचा दिखावा करण्याचा अधिकार नाही.’’

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘डावी विषवल्ली’, तर डॉ. योगेश जोशी यांच्या ‘धर्मसंस्कृतीचे विद्यापीठ डॉ. सच्चिदानंद शेवडे’ या ग्रंथांचे प्रकाशन !

डॉ. सच्चिदानंद शेवडे लिखित ‘डावी विषवल्ली’ या अनुवादित पुस्तकाचे आणि त्यांच्या एकसष्ठीनिमित्त डॉ. योगेश जोशी यांनी संपादित केलेल्या ‘धर्मसंस्कृतीचे विद्यापीठ डॉ. सच्चिदानंद शेवडे’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. या गौरव ग्रंथाचे प्रकाशक हेमंत नेहते यांचे अक्षरमंच प्रकाशन आणि पुंडलिक पै यांचे पै लायब्ररी हे आहेत.