एका गायीच्या शेणापासून ३ घरांना वर्षभर मिळू शकते वीज !
लंडन (ब्रिटन) – गायीच्या शेणापासून आता वीजनिर्मिती केली जात आहे. ब्रिटनमधील शेतकर्यांनी गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती करण्याचा पर्याय शोधला आहे. ब्रिटिश शेतकर्यांनी गायीच्या शेणापासून एक पावडर सिद्ध केली आहे. त्या पावडरचा वापर करून ‘बॅटरी’ बनवण्यात येत असल्याचे शेतकर्यांच्या एका गटाने सांगितले. ब्रिटिश शेतकर्यांनी केलेल्या प्रयोगात गायीच्या १ किलो शेणापासून एवढी वीजनिर्मिती झाली की, त्यावर ‘व्हॅक्यूम क्लिनर’ ५ घंटे चालवता येणे शक्य आहे.
१. ब्रिटनमधील ‘अर्ला डेअरी को-ऑपरेटिव्ह’ने शेणाची पावडर बनवून बॅटरी बनवली आहे. त्याला ‘काऊ बॅॅटरी’ असे नाव दिले आहे. या बॅटरीच्या साह्याने कपडे साडेतीन घंट्यांपर्यंत इस्त्री करणेही शक्य आहे.
२. ‘एका गायीच्या शेणापासून ३ घरांना वर्षभर वीज मिळू शकते’, असा दावा बॅटरी तज्ञ ‘जी.पी. बॅटरीज्’ यांनी केला आहे. १ किलो शेण ३.७५ किलोवॉट वीज निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत ४ लाख ६० सहस्र गायींच्या शेणापासून वीज बनवली, तर १२ लाख घरांना वीजपुरवठा करता येऊ शकतो. ‘अर्ला डेअरी’ एका वर्षात १० लाख टन शेणाचे उत्पादन करते.