गोव्यातील सर्व ४० आमदार कोट्यधीश !

  • ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ संघटनेचा अहवाल

  • विद्यमान ११ आमदारांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची, तर ९ आमदारांवर गंभीर आरोप

पणजी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) –  राज्यातील सर्व ४० आमदार हे कोट्यधीश आहेत. कोट्यवधी संपत्ती असलेले सर्वाधिक आमदार हे सत्ताधारी भाजपमध्ये आहेत. कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो, आमदार प्रतापसिंह राणे आणि आमदार पांडुरंग मडकईकर हे सर्वाधिक संपत्ती असणारे श्रीमंत आमदार आहेत. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ए.डी.आर्.) या संघटनेने गोवा विधानसभा निवडणुकीला सुमारे ३ मास असतांना माजी आमदार लुईझिन फालेरो यांच्यासह सर्व ४० आमदारांची सविस्तर माहिती असलेला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वर्ष २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी निवडणूक आयुक्तांना प्रतिज्ञापत्राद्वारे सुपुर्द केलेल्या माहितीच्या आधारावर सर्व आमदारांचा लेखाजोखा ‘ए.डी.आर्.’ने प्रसिद्ध केला आहे. यामधील बहुतांश आमदार वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत उभे रहाणार असल्याने या अहवालाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

कोट्यधीश आमदारांची माहिती

राज्यातील सर्व ४० आमदार कोट्यधीश आहेत. राज्यातील प्रत्येक आमदाराची सरासरी संपत्ती ११ कोटी ७५ लक्ष रुपये आहे. प्रत्येक आमदाराची सरासरी संपत्ती पक्षवार पुढीलप्रमाणे आहे.

भाजप ११ कोटी ९७ लक्ष रुपये
काँग्रेस १७ कोटी ७ लक्ष रुपये
‘गोवा फॉरवर्ड’ ८ कोटी ५५ लक्ष रुपये
राष्ट्रवादी काँग्रेस १३ कोटी ६ लक्ष रुपये
मगो पक्ष १० कोटी ५८ लक्ष रुपये
३ अपक्ष आमदार ४ कोटी १४ लक्ष रुपये

कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांची संपत्ती ५४ कोटी  रुपये, काँग्रेसचे प्रतापसिंह राणे यांची ५० कोटी रुपये आणि भाजपचे आमदार पांडुरंग मडकईकर यांची ३२ कोटी रुपये संपत्ती आहे. गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांची संपत्ती इतरांच्या तुलनेत सर्वांत अल्प म्हणजे सव्वा कोटी रुपये आहे.

अहवालात पुढे म्हटले आहे की, राज्यातील ४० आमदारांपैकी ११ आमदारांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि हे प्रमाण २८ टक्के एवढे आहे. ९ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि यातील एका आमदारावर महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात गंभीर आरोप आहेत. भाजपच्या २७ पैकी ७ आमदारांवर गुन्हेगारीच्या संदर्भात आरोप आहेत. काँग्रेसच्या ५ पैकी १, ‘गोवा फॉरवर्ड’च्या ३ आमदारांपैकी १, राष्ट्रवादीचा १ आणि ३ अपक्ष आमदार यांनी त्यांच्यावर विविध स्वरूपांचे आरोप असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सत्ताधारी पक्षातील एका आमदारावर महिलाविषयक गुन्हेगारीचा गंभीर स्वरूपाचा (भा.दं.सं.च्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंद झालेला) आरोप आहे.

इयत्ता ८ वी किंवा इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण झालेले १९ आमदार

विधानसभेत १९ आमदारांचे इयत्ता ८ वी किंवा इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण झालेले आहे. १६ आमदारांचे शिक्षण हे पदवी किंवा पतव्युत्तरपर्यंत, तर ५ आमदारांनी व्यावसायिक शिक्षणात ‘डिप्लोमा’ पदवी संपादन केली आहे. विधानसभेतील १८ आमदार हे २५ ते ५० वर्षे या वयोगटातील आहेत, तर २२ आमदार हे ५२ ते ८२ वर्षेे वयोगटातील आहेत.