गायरान (गायींना चरण्यासाठीची) भूमी वाचवली, तर गायी आणि हिंदुत्व यांचे रक्षण होण्यासह अब्जावधी रुपयांचे घोटाळे थांबणे शक्य !

गायरान

१. कुरण आणि गायरान यांत भेद असणे

‘भारतात पशूंच्या चराऊ भूमीला ‘कुरण’ आणि गायींच्या चराऊ भूमीला ‘गायरान’ म्हणत. गायरानामध्ये गायी व्यतिरिक्त इतर कोणताही पाळीव पशू चरू शकत नव्हता.

२. पूर्वी प्रत्येक गावासाठी १२ ते १८ टक्के राखून ठेवलेले गायरान आता २ टक्केही शेष न रहाणे

पूर्वी प्रत्येक गावासाठी १२ ते १८ टक्के गायरान राखून ठेवलेले असायचे. गायरानाला महत्त्व दिल्यामुळे गायरानावर मंदिर, विद्यालय, चिकित्सालय किंवा गोशाळाही बनवण्याची अनुमती नव्हती. ज्या गावातील लोक गायरानात अन्य गोष्टी करत, त्यांच्याकडचे कुणी पाणीसुद्धा पित नव्हते. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने त्यांचे शासन असतांना गायरानाचे नाव ‘गायरान’च ठेवले; परंतु त्यांनी गायरानाला कुरण बनवले. आता तर गायराने २ टक्केही शेष राहिलेली नाहीत.

३. गायरानाचे महत्त्व

३ अ. इतर पशूंनी खाल्लेल्या गवतामुळे गवत मुळांपासून नष्ट होणे; परंतु गायीने खाल्लेल्या गवताचा आणि झाडाचा विकास होणे : गायरानाला कुरणापासून वेगळे ठेवण्यात आले होते; कारण हिंदु गायीला केवळ पशू मानत नाहीत. म्हैस गवत खातांना ते ओढते. त्यामुळे बर्‍याच वेळा गवत मुळापासून उखडले जाऊन ते नष्ट होते. बकरी झाडांच्या फांद्या चावून त्यांचा नाश करते. बोकड उन्हाळ्यात त्याच्या खुरांनी माती उकरून गवताची मुळे खातो; परंतु गाय जे काही खाते, ते कधी नष्ट करत नाही; उलट त्याचा आणखी विकास होतो. गाय जी फांदी खाते, त्यापासून ४ नवीन शाखा फुटतात.

३ आ. गाय केवळ हिंदूंची किंवा मनुष्याची माता नसून ती वनस्पतींसह संपूर्ण विश्वाची माता असणे :  ‘गावो विश्वस्य मातरः ।’ (बृहत्संहिता, अध्याय ४७, श्लोक ६८) म्हणजे ‘गाय ही संपूर्ण विश्वाची माता आहे.’ गाय केवळ हिंदूंची किंवा मनुष्याची माता नाही, तर ती वनस्पती, निसर्ग आणि संपूर्ण विश्व या सर्वांची माता आहे.

४. गायराने नष्ट झाल्याने आर्थिक समस्या निर्माण होणे

‘गायरान’ हे जलसंग्रह क्षेत्र असे. जोरात पडलेल्या पावसामुळे शेत-कुरणे यांतीलही मातीही वाहून जाते. गायरानात गवताची मुळे जीवित असतात. त्यांच्या आधाराने पावसाचे पाणी भूमीमध्ये मुरते; मात्र अलीकडे गायराने नष्ट झाल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्यांच्या निर्मूलनासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये आर्थिक घोटाळेही होत आहेत.

४ अ. पूर घोटाळा : जलसंग्रह क्षेत्राचा नाश झाल्यामुळे अधिकचा पाऊस पडल्यास त्या पाण्याचा निचरा न होता पूरस्थिती निर्माण होते. त्या पुरानंतर पूरग्रस्त लोकांना सरकारी निधीच्या माध्यमातून अब्जावधी रुपये दिले जातात. त्यात घोटाळा केला जातो.

४ आ. दुष्काळ निधी घोटाळा : भूमीमध्ये जलसंग्रह झाला नाही, तर कालांतराने दुष्काळाचा धोका निर्माण होतो. त्यानंतर दुष्काळग्रस्त लोकांना ‘दुष्काळ निधी’ दिला जातो. त्यातही घोटाळा केला जातो.

४ इ. धरण-कालवे बांधण्यातील घोटाळे : गायराने नष्ट झाल्यामुळे गावाकडील भूमीखाली १५-२० फुटांवर लागणारे पाणी ३००-७०० फूट खोल गेले आहे. पाण्याचा खारटपणा वाढला आहे. त्यामुळे शेती अन् गावे उजाड झाली आहेत. औद्योगिक क्षेत्र असलेली शहरे वसवली जात आहेत. त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी धरणे आणि कालव्यांची निर्मिती केली जाते. त्यातही कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होत आहेत.

४ ई. दूध, डेअरी (दूध आणि दुधाचे पदार्थ यांवर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय) अन् पशूवधगृहे यांमध्ये होणारे घोटाळे : पूर्वी गाय गायरानातून चरून आल्यावर घरी दूध देत असे. लोकांना पुष्कळ श्रेष्ठ गुणवत्तेचे दूध विनामूल्य मिळत होते. दूध, ताक विकले जात नव्हते. आता परावलंबी झालेल्या शहरी लोकांसाठी दूध डेअर्‍या उघडल्या गेल्या. त्यासह पशूवधगृहेसुद्धा चालू करण्यात आली आहेत. आता दूध, डेअरी आणि पशूवधगृहे यांमध्येही कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होत आहेत.

४ उ. पोषक आहाराच्या नावाने होणारे घोटाळे : विनामूल्य दूध, ताक मिळणे बंद झाल्यामुळे लोकांचे कुपोषण होऊ लागले. स्वस्त अन्न, फुकटचे किंवा अनुदानित अन्न, पोषक आहार योजना इत्यादींच्या नावाखाली अत्यंत खालच्या स्तरावरचे राजकारण आणि अब्जावधी रुपयांचे घोटाळे होत आहेत.

४ ऊ. इंधन घोटाळा : गाय गायरानातून चरून घरी आल्यावर विनामूल्य जळण, म्हणजे शेण देते. शेणापासून बनवलेल्या गोवरीच्या मंद आचेवर बनवलेले भोजन अत्यंत पौष्टीक होते. महिलांना जळणासाठी दूरवर जाऊन झाडे तोडावी लागत नव्हती. आता या नैसर्गिक जळणाच्या अभावामुळे इंधनाच्या नावावर रॉकेल, गॅस विक्रीमध्ये आर्थिक घोटाळे होतात.

४ ए. डास (मच्छर) निर्मूलन अभियानाच्या नावाखाली होणारे घोटाळे : पूर्वी गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवरीच्या प्रदूषणरहित धुरामुळे माशा आणि डास गावापासून दूर रहात. आता डास निर्मूलन अभियानाच्या नावाखाली घोटाळे होतात.

४ ऐ. चिकित्सालये आणि औषधोपचार यांच्या नावाखाली घोटाळे : प्रत्येक जिल्ह्यात २०० वर्षांपूर्वीची कितीतरी पुरातन मंदिरे, राजवाडे, किल्ले आहेत; परंतु संपूर्ण देशात २०० वर्षांपूर्वीचे एकही पुरातन रुग्णालय नाही. याचे कारण काय ? तर गायरानात कोट्यवधी प्रकारच्या औषधी वनस्पती विनामूल्य मिळत होत्या. लोकांना दूध, दही मुबलक प्रमाणात मिळत होते. यामुळे लोकांचे आरोग्य पुष्कळ चांगले असायचे. िचकित्सालयाची आवश्यकता तरी कशी भासणार ? परंतु आता चिकित्सालये आणि औषधोपचार यांच्या नावाखाली अब्जावधी रुपयांचे घोटाळे होत आहेत.

४ उ. रासायनिक खतांचे (‘फर्टिलायजर’चे) घोटाळे : गायरानातून चरून आलेल्या गायीचे शेण उच्च प्रतीचे ‘शेणखत’ होत असे. अशा प्रकारच्या सेंद्रिय खतांचा अभाव निर्माण करून रासायनिक खतांच्या माध्यमातून घोटाळे होत आहेत.

४ ऊ. कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी घोटाळे : रासायनिक खतांमुळे पिके कमकुवत होऊ लागली. कमकुवत पिकांना अधिक रोग होतात. त्याच्या निवारणासाठी कीटकनाशके उपलब्ध करून दिली जातात. ती खरेदी करणे, त्याची साठेबाजी अशा माध्यमातून घोटाळे होत आहेत.

४ ओ. डिझेल घोटाळा : भूमीमध्ये खोलवर असलेले पाणी वर काढण्यासाठी डिझेल इंजिन लावण्यात येतात. नंतर डिझेल विक्री आणि सवलती यांच्या नावाखाली घोटाळे होतात.

४ औ. वीज घोटाळा : विजेच्या अब्जावधी रुपयांच्या घोटाळ्यांपासून कोण अपरिचित आहे ?

४ अं. ट्रॅक्टर घोटाळा : रासायनिक खते वापरल्याने भूमी घट्ट आणि कडक होते. त्या नांगरण्यासाठी ट्रॅक्टर वापरले जातात. ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी शासनाकडून देण्यात येणार्‍या अनुदानामध्ये आर्थिक घोटाळे केले जातात.

४ क. भूखंड घोटाळा : कामगार झालेल्या शेतकर्‍यांसाठी वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या भूखंडामध्ये अब्जावधी रुपयांचे घोटाळे झाले आणि होत आहेत.

प्रत्यक्षात हा विषय एका लेखात संपणार नसून त्याचे एक मोठे पुस्तक होईल, एवढा हा विषय मोठा आहे. घोटाळ्यांसाठी ‘अब्ज’ हा शब्दही फारच लहान आहे. त्यामुळे गायीसाठी अनुदान नको, तर गायराने मिळाली पाहिजेत. असे केले, तर गायी वाचतील, हिंदुत्वाचे रक्षण होईल अन् अब्जावधी रुपयांचे घोटाळेही होणार नाहीत.’

(साभार : ‘संवत्सर सुषमा’ दिनदर्शिका)