फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांना अधिवक्ता आशुतोष दुबे यांच्याकडून नोटीस

अर्धनग्न ‘मॉडेल्स’चा (अभिनेत्रींचा) वापर करून मंगळसूत्राचे विज्ञापन केल्याचे प्रकरण

  • हिंदु धर्मात मंगळसूत्र हे विवाहाचे पवित्र बंधन मानले आहे. त्याला धार्मिक महत्त्वही आहे. असे असतांना हिंदूंच्या धार्मिक परंपरांशी संबंधित उत्पादनांची अशा प्रकारे अश्‍लाघ्य विज्ञापने दाखवणे, हा एक प्रकारे हिंदु धर्मावर केलेला आघातच आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक विधींचे महत्त्व तर न्यून होतेच, शिवाय या धार्मिक विधींचे पावित्र्यही नष्ट होते, तसेच त्यांचा अवमान होतो ! – संपादक 
  • हिंदूंनी धर्माशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींवरील आघातांची षड्यंत्रे संघटितपणे वैध मार्गाने रोखली पाहिजेत, तसेच संबंधित आस्थापनांच्या उत्पादनांवर बहिष्कार घातला पाहिजे; जेणेकरून परत परत हिंदूंच्या धार्मिक गोष्टींवर आघात करण्याचे धैर्य त्यांना होणार नाही ! – संपादक 
  • हिंदु धर्मातील प्रतीकांचा अवमान करणार्‍यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद हवी ! – संपादक 

मुंबई – हिंदु धर्मात विशेष महत्त्व असलेल्या आणि सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाणार्‍या मंगळसूत्राच्या विविध विज्ञापनांत अर्धनग्न आणि कामूक हावभावातील ‘मॉडेल्स’ (अभिनेत्री) दाखवल्याच्या प्रकरणी ‘फॅशन डिझायनर’ (आधुनिक पद्धतींनुसार कपडे सिद्ध करणारे) सब्यसाची मुखर्जी यांना डहाणू (जिल्हा पालघर) येथील अधिवक्ता तथा भाजपचे कायदेशीर सल्लागार आशुतोष दुबे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली.

मुखर्जी यांनी विविध सामाजिक प्रसारमाध्यमांवरून ही विज्ञापने प्रसारित केली आहेत. ‘रॉयल बंगाल मंगलसूत्र’ या आस्थापनाची ही विज्ञापने आहेत. मंगळसूत्र हे महिलांशी संबंधित असतांना या उत्पादनाच्या विविध विज्ञापनांत अधर्मनग्न महिलेला जवळ घेतलेला अर्धनग्न पुरुषही दाखवण्यात आला आहे. हे पाहून ‘हे मंगळसूत्राचे विज्ञापन आहे कि कामसूत्राचे ?’ अशी टीका सामाजिक माध्यमांतून होत आहे.
हिंदु धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक असलेल्या विवाहसंस्कारात मंगळसूत्र हा सौभाग्यालंकार पतीकडून पत्नीला विधीपूर्वक घातला जातो. हिंदूंकडून सामाजिक माध्यमांवर या विज्ञापनांचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे.

सब्यसाची मुखर्जी यांनी याविषयीची सर्व विज्ञापने त्वरित हटवून हिंदूंंची क्षमा मागावी ! – अधिवक्ता दुबे

अधिवक्ता दुबे यांनी मुखर्जी यांना ३१ ऑक्टोबर या दिवशी नोटीस पाठवून त्यांच्या भावना व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘‘मंगळसूत्र हे भगवान शिव आणि पार्वतीमाता यांच्या नात्याचे प्रतीक आहे. अशा मंगळसूत्राचा अवमान हिंदु समाज सहन करणार नाही. सब्यसाची मुखर्जी यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केलेल्या याविषयीची सर्व विज्ञापने त्वरित हटवावीत आणि हिंदूंंची क्षमा मागावी.’’

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या चेतावणीनंतर सब्यसाची मुखर्जी यांचे आक्षेपार्ह विज्ञापन मागे !

हिंदूंवरील सर्वच आघातांच्या संदर्भात मिश्रा यांनी अशी भूमिका द्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

वादाच्या भोवऱ्यात सब्यसाचीने मंगळसूत्राची जाहिरात मागे घेतली

या प्रकरणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सब्यसाची मुखर्जी यांना ‘२४ घंट्यांच्या आत संबंधित विज्ञापने न हटवल्यास गुन्हा नोंद करू’, अशी चेतावणी दिली होती. या चेतावणीनंतर मुखर्जी यांनी हे आक्षेपार्ह विज्ञापन मागे घेतले. मुखर्जी यांनी ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमावर विज्ञापन हे मागे घेत असल्याची माहिती दिली आहे.

…तर थेट कारवाई केली जाईल ! – मिश्रा

मुखर्जी किंवा अन्य कुणीही लोकांच्या भावना दुखावू नयेत. सब्यसाची मुखर्जीं यांनी पुन्हा अशा प्रकारचे विज्ञापन प्रसिद्ध केले, तर कोणतीही चेतावणी दिली जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल, अशी चेतावणी मिश्रा यांनी दिली.

(या बातमीतील सर्व छायाचित्रे / व्हिडिओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)