वासरू गायीचे दूध पीत असतांना तिने वासराच्या शेपटीच्या मुळाच्या बाजूला चाटणे, यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

१. गायीचे आध्यात्मिक महत्त्व

‘गाय’ ही ‘पावित्र्य आणि सृजनता’ यांचे प्रतीक आहे. तिच्यामध्ये ३३ कोटी देवतांचा वास आहे. गायीच्या केवळ दर्शनाने अनेक प्रकारच्या पापांचा नाश होतो. गोपूजनामुळे आणि गोग्रास दिल्यामुळे घोर पापांचे क्षालन होते. गायीमध्ये पुष्कळ प्रमाणात वात्सल्यभाव आहे. गायीच्या या दैवी गुणांमुळे तिला हिंदु धर्मामध्ये ‘गोमाता’ असे संबोधले आहे. गाय ‘गोमाता’ असल्यामुळे ती सात्त्विक जिवांचे मातेप्रमाणे पालनपोषण करते. ‘गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप’, हे पंचगव्य प्राशन केल्यामुळे देहाची अन् पंचगव्य प्रोक्षण केल्यामुळे स्थळाची शुद्धी होते. गोमातेचे पूजन केल्याने आणि गोग्रास दिल्यामुळे कर्त्याला पुण्य लाभते. त्रेतायुगात रघुवंशातील राजा दिलीप याने गायीची मनोभावे सेवा करून आणि तिचे वाघापासून रक्षण करून तिचा आशीर्वाद प्राप्त केला होता. जेव्हा विश्वामित्र ऋषींनी वसिष्ठ ऋषींशी लढण्यासाठी त्यांच्या आश्रमात सैन्य पाठवले होते, तेव्हा वसिष्ठ ऋषींकडील कपिला गायीमधून देवसैनिक निर्माण होऊन ते विश्वामित्रांनी पाठवलेल्या सैनिकांशी लढले. इतके गायीचे महत्त्व आहे. कार्तवीर्य सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींकडील कामधेनू गायीला ऋषींच्या आश्रमातून बळजोरीने स्वत:च्या महालात आणले. त्यामुळे जमदग्नी पुत्र भगवान परशुरामाने कार्तवीर्य सहस्रार्जुनाशी युद्ध करून त्याचा वध करून कामधेनूला परत पित्याच्या आश्रमात आणले.

कु. मधुरा भोसले

 

२. वासराने गायीचे दूध पित असतांना गायीने वासराला चाटण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव

जेव्हा वासरू गायीचे दूध पित असते, तेव्हा तिचा वात्सल्यभाव पुष्कळ प्रमाणात जागृत होऊन ती वासराला प्रेमाने चाटून तिच्यातील प्रेम व्यक्त करते. त्यामुळे गाय आणि वासरू यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे एक अतूट नाते निर्माण होते. तिचा वात्सल्यभाव जेव्हा जागृत होतो, तेव्हा तिच्यातील ३३ कोटी देवतांची तारक शक्ती जागृत होऊन ती समष्टीचे कल्याण करण्यासाठी वातावरणात प्रक्षेपित होते. या वात्सल्यभावाचा सुपरिणाम वासरावर व्यष्टी स्तरावर आणि समाज अन् राष्ट्र यांच्यावर म्हणजे समष्टी स्तरावर होतो.

२ अ. वासराला व्यष्टी स्तरावर लाभ होणे : गायीच्या वात्सल्यापोटीच ती जेव्हा प्रेमाने वासराला चाटते, तेव्हा वासराच्या भोवती सात्त्विकता आणि चैतन्य यांचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे वासराचे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होऊन त्याचे जीवन सुरक्षित होते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२१)