१५ दिवसांत निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याची गवस यांची चेतावणी
अशा प्रकारे आंदोलन करून आरोग्य केंद्राच्या कामाची नोद घ्यायला लावावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक
दोडामार्ग – साटेली, भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या रखडलेल्या कामाच्या विरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांनी २५ ऑक्टोबरला चालू केलेले उपोषण शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी ‘या प्रकरणाकडे पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधू’, असे आश्वासन दिल्यानंतर स्थगित केले. १५ दिवसांत या प्रकरणाचा निकाल न लागल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याची चेतावणी गवस यांनी या वेळी दिली.
साटेली, भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र हे दुर्गम भागात सेवा देणारे एकमेव आरोग्य केंद्र आहे. येथे प्रामुख्याने साटेली, भेडशी लगतची गावे, तसेच मांगेली, तेरवण, भेकुर्ली, केरा, निडलवाडी, हेवाळे, घाटीवडे, केंद्रे यांसारख्या दुर्गम भागांतील रुग्णांना सेवा दिल्या जातात, तसेच जवळजवळ ३० ते ३२ गावे याच प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्राथमिक उपचारासाठी अवलंबून आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम गेल्या २ वषार्ंपासून चालू असून अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. (३० ते ३२ गावे प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असतांना इमारतीचे काम रखडवणे दुर्दैवीच ! यातून प्रशासनाची ग्रामीण जनतेप्रतीची असंवेदनशीलता लक्षात येते ! – संपादक) त्यामुळे या भागातील रुग्णांची असुविधा होत आहे. याविषयी माहिती देण्याविषयी संबंधित अधिकार्यांकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जिल्हाधिकार्यांना पत्र देऊनही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे उपोषणाचा निर्णय घेतल्याचे गवस यांनी सांगितले.
या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी पाठिंबा दर्शवला, तर जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी गवस यांची भेट घेऊन चौकशी केली.