हिंदूंच्या धार्मिक संस्थेमध्ये केवळ हिंदूंना नोकरी देण्याचा नियम असतांना मुसलमान तरुणाकडून नोकरीसाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका

किती हिंदू हे मुसलमानांच्या धार्मिक संस्थेमध्ये नोकरीसाठी अर्ज करतात आणि त्यांना नोकरी दिली जाते ? नोकरी दिली जात नाही म्हणून किती हिंदू अशा प्रकारे न्यायालयामध्ये जाऊन दाद मागतात ? – संपादक

चेन्नई (तमिळनाडू) – राज्यातील हिंदु धार्मिक आणि धर्मार्थ व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत येणार्‍या येथील अरुलमिगु कपालीश्‍वरार कला आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये केवळ हिंदूंना नोकरी देण्यात येते. या विभागाच्या अंतर्गत येणार्‍या सर्वच संस्थांमध्ये हा नियम लागू आहे. असे असतांना या महाविद्यालयात नोकरी मिळण्यासाठी ए. सुहैल या मुसलमान तरुणाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

१. या याचिकेत सुहैल याने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ‘हिंदु’ शब्दाची व्याख्या करतांना ‘हिंदु’ शब्द कोणत्याही धर्माचे दर्शक नाही किंवा तो ‘धर्म’ नाही, तर ती एक जीवन जगण्याची पद्धत आहे, असे म्हटले आहे. असे आहे, तर नोकरीसाठी अर्ज करणारी व्यक्ती हिंदु आहे कि नाही, हे कसे सिद्ध करणार ? यामुळे भारतीय मुसलमान किंवा ख्रिस्ती यांना कोणत्याही महाविद्यालयात नोकरीसाठी अर्ज करण्यापासून रोखता येऊ शकत नाही. तसेच राज्यघटनेत स्पष्ट करण्यात आले आहे की, धर्माच्या आधारे राज्य भेदभाव करू शकत नाही. यामुळे नोकरीसाठी ठेवण्यात आलेली अट राज्यघटनेच्या विरोधात आहे. शिक्षण आणि शिक्षणेतर पदांचा धार्मिक कार्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे अशा पदांसाठी सर्व धर्मांच्या लोकांना अनुमती दिली पाहिजे.

२. या याचिकेपूर्वी ‘असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी’चे माजी अध्यक्ष के. पांडियन यांनीही धर्मादाय विभागाच्या निर्णयावर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, राज्य सरकारद्वारे संचालित कोणत्याही विभागाकडून धर्माच्या आधारे नियुक्ती करणे, हा भेदभाव असून असे करता येऊ शकत नाही. मदुराई वक्फ बोर्डामध्ये अनेक मुसलमानेतर काम करतात, असे उदाहरणही त्यांनी दिले होते.