चांगली कामगिरी नसलेल्या भाजपच्या नगरसेवकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय ! 

  • ५० सहस्र तरुणांची फळी सिद्ध करणार !

  • नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नागपूर – येथील महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. चांगली कामगिरी नसलेल्या शहरातील भाजपच्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

गेल्या साडेचार वर्षांत सत्ताधारी भाजपचे काही नगरसेवक प्रभागात फिरकलेच नाहीत. त्यामुळे भाजपकडून नवीनांना संधी देण्यात येणार आहे, तर ४० ते ५० नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही. गेल्या निवडणुकीत भाजपचे १५१ पैकी १०८ नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या वतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तरुणांचे मेळावे चालू करण्यात आले आहेत. भाजपच्या वतीने जिल्ह्यात ५० सहस्र तरुणांची फळी सिद्ध करण्यात येणार आहे. एका बुथवर २५ तरुणांची फळी काम करेल. त्यादृष्टीने भाजपची सिद्धता चालू आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.