|
देहली – देहलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाच्या अंतर्गत संस्कृत विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना एम्.ए. (वेदिक) करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वेदांमधील विज्ञान, चिंतन आदी गोष्टींचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठामध्ये हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी समन्वय साधणारे संस्कृत विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. देवेशकुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासक्रमाच्या विकासासाठी देशभरातून वेदांच्या विद्वानांना आमंत्रित करण्यात आले होते. अभ्यासक्रम निर्माण समितीची ४ आणि ५ ऑक्टोबर या दिवशी बैठक आयोजित करण्यात आली होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. नागेश्वर राव या अभ्यासक्रमाविषयी म्हणाले, ‘‘आजच्या काळात हा अभ्यासक्रम वेदांचे महत्त्व आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.’’