रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

‘१९.१.२०२० ते २१.१.२०२० या दिवसांत रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे आगमन, पूजा आणि प्रतिष्ठापना हे कार्यक्रम पार पडले. त्या वेळी मला देवीची मूर्ती उचलण्याची सेवा होती. ही सेवा मिळाल्यामुळे मला आनंद झाला आणि कृतज्ञता वाटली. आमच्याकडून देवीच्या चरणी प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत होत्या. ही सेवा करतांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्री. अक्षय पाटील

१. ‘देवीची मूर्ती सहज उचलू शकू’, असा विचार येणे आणि मूर्ती आणण्यासाठी गेलेल्या साधकांनी ‘६ साधकांनाही मूर्ती उचलणे कठीण गेले’, असे सांगणे

१९.१.२०२० या दिवशी मला सकाळी लवकर जाग आली. तेव्हा एक वेगळाच आनंद जाणवत होता. या सेवेचा निरोप मिळाल्यावर माझ्या मनात ‘मी ही सेवा सहज करू शकतो, अधिक साधकांची आवश्यकता भासणार नाही’, असा विचार आला. जे साधक मूर्ती आणण्यासाठी गेले होते, त्यांनी सांगितले, ‘‘देवीची मूर्ती उचलण्यासाठी ६ साधक लागले. त्यातील २ साधक एकदम बळकट होते, तरीही त्यांना देवीची मूर्ती उचलता येत नव्हती. तुम्ही सर्वजण देवीलाच प्रार्थना करा.’’

२. ‘मूर्तीकडे पहातच रहावे’, असे वाटणे

सकाळी मूर्तीची प्रथम ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ चाचणी घ्यायची होती. मी तिथे पोचल्यानंतर प्रथमच मूर्ती पाहिली. मूर्तीवर कापड झाकले होते. ती उचलण्यासाठी ते कापड बाजूला केल्यानंतर ‘मूर्तीकडे पहातच रहावे’, असे वाटत होते. देवीचे मुख आनंदी आणि तेजस्वी वाटले.

३. मूर्तीखालचे कापड धरून मूर्ती हालवण्याचा प्रयत्न केल्यावर ती न हलणे आणि सर्व साधकांनी देवीला प्रार्थना केल्यावर ती उचलून ‘यु.ए.एस्.’ चाचणी करत असलेल्या ठिकाणी ठेवता येणे

गाडीतून मूर्ती बाहेर काढण्यासाठी तिच्या खालचे कापड धरून हालवण्याचा प्रयत्न केला; पण ती हलली नाही. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी देवीची मूर्ती उचलू शकतो’, असा विचार माझ्या मनात आला; पण ते शक्य नाही. माझी शक्ती येथे पुरणार नाही. ही सेवा देवी आणि भगवंतच करवून घेऊ शकतात. मी किंवा अन्य साधकही काही करू शकत नाही.’ नंतर मूर्ती उचलणार्‍या सर्व साधकांनी देवीला प्रार्थना केली आणि मूर्ती उचलून ‘यु.ए.एस्.’ चाचणी करतात, त्या ठिकाणी ठेवली. त्या वेळी मूर्तीचे वजन अधिक वाटले नाही. एकदा आम्ही ४ जणांनीच मूर्ती उचलून पाहिली, तेव्हा ‘देवीने मूर्तीचे वजन अल्प केले आहे’, असे वाटले.

४. तिसर्‍या माळ्यावर मूर्ती नेण्यासाठी उद्वाहनाजवळ (लिफ्ट) आल्यावर वीजपुरवठा खंडित होणे आणि देवीच्या कृपेने अकस्मात् वीजपुरवठा चालू होणे

दुपारी देवीची मूर्ती सजवण्यासाठी (साडी आणि अलंकार घालण्यासाठी) एका ठिकाणी न्यायची होती. ती सदनिका तिसर्‍या माळ्यावर होती आणि इमारतीतील उद्वाहन बंद पडले होते. पायर्‍यांवरून मूर्ती नेणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही ‘अन्य कोणत्या ठिकाणी मूर्ती नेऊ शकतो’, ते पहात होतो. इतक्यात अकस्मात् उद्वाहन चालू होऊन मूर्ती तिसर्‍या माळ्यावरील सदनिकेमध्ये नेता आली. येथे ‘देवीनेच उद्वाहन चालू केले आणि तीच आमच्याकडून सर्वकाही करवून घेत आहे’, असे जाणवले.

५. देवीचे मिरवणुकीने आश्रमात आगमन

त्यानंतर आम्ही मूर्ती मिरवणुकीसाठी सजवलेल्या गाडीत आणून ठेवली. तेथे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देवीची पूजा केली आणि मिरवणुकीला आरंभ झाला. मिरवणुकीतील वातावरण आनंदी होते. आम्ही घोषणा देत आणि जयजयकार करत मूर्तीला आश्रमात आणले.

६. पूजेच्या ठिकाणी ठेवतांना मूर्तीचे वजन अधिक असल्याचे जाणवणे

देवीची मूर्ती मिरवणुकीच्या गाडीतून उतरवून आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ पूजेच्या ठिकाणी ठेवायची होती. मूर्ती उचलून नेतांना तिचे वजन सकाळी ‘यु.ए.एस्.’ चाचणीच्या वेळी जेवढे होते, त्यापेक्षा अधिक वाटत होते. तेव्हा मला एका संतांनी सांगितलेले आठवले, ‘देवीला आश्रमात आल्यानंतर आनंद झाला आहे. त्यामुळे मूर्तीचे वजन वाढले आहे.’

७. देवीला वाहिलेल्या फुलांच्या पाकळ्या खाली पडणे आणि ‘देवीने सर्वांना आशीर्वाद दिला आहे’, असे वाटणे

देवीची मूर्ती पूजेसाठी सिद्ध केलेल्या पटलावर ठेवली. बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उभ्या होत्या. त्या वेळी देवीला वाहिलेल्या फुलांच्या पाकळ्या खाली पडल्या. (तिथे वारा नव्हता अथवा कुणाचा हातही लागला नव्हता.) ते पाहून माझी भावजागृती झाली आणि ‘देवीने सर्वांना आशीर्वाद दिला आहे’, असे वाटले. त्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी देवीची पूजा केली.

८. पूजा झाल्यानंतर देवीची मूर्ती आश्रमाच्या स्वागतकक्षात देवीसाठी बनवलेल्या पटलावर ठेवायची होती. तेव्हा मूर्तीचे वजन आणखी वाढल्याचे जाणवले. आम्ही ७ जण असूनही ती मूर्ती उचलता येत नव्हती.

९. मूर्तीची स्थापना करतांना सर्वांनी प्रार्थना करून मूर्ती उचलल्यावर ती एकदम हलकी झाल्याचे जाणवणे

२१.१.२०२० या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना करायची होती. आम्ही सर्वजण आदल्या दिवसापासून सिद्धता करत होतो. पहिल्या दिवशी सेवेत काही चुका झाल्या होत्या. त्यामुळे ‘पुढील सेवा परात्पर गुरु डॉक्टर आणि श्री भवानीदेवी यांना अपेक्षित अशी व्हावी’, यासाठी प्रार्थना होत होती. मूर्ती उचलतांना आम्हाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई सेवा भावपूर्ण होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगत होत्या. त्या वेळी सर्वांनी प्रार्थना करून मूर्ती उचलल्यावर ती एकदम हलकी वाटत होती. ‘देवीनेच मूर्तीचे वजन न्यून केले आहे आणि तीच आम्हा सर्वांकडून ही सेवा करवून घेत आहे’, असे वाटून कृतज्ञता वाटली.

१०. एरव्ही मला अधिक वजन उचलल्यास पाठ दुखते; पण ही सेवा करतांना मूर्तीचे वजन अंदाजे २०० ते २५० किलो असूनही, तसेच मूर्ती अनेकदा उचलूनही पाठदुखीचा किंवा इतर कोणताही शारीरिक त्रास झाला नाही.’

– श्री. अक्षय पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१.२०२०)