जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक येथील इस्लामिक स्टेटच्या १८ ठिकाणांवर एन्.आय.ए.चे छापे

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) जम्मू-काश्मीरमधील १६ ठिकाणी, तर कर्नाटक येथील भटकळमध्ये २ ठिकाणी छापे घातले. यांत इस्लामिक स्टेटच्या ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या ऑनलाईन नियतकालिकाचा जुफरी जवाहर दामुडी याला अटक करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या साहाय्याने हे छापे घालण्यात आले.

एन्.आय.ए.ने म्हटले आहे की, भारतात विविध भागांत कार्यरत असलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ नियतकालिकाद्वारे ऑनलाईन नेटवर्क सिद्ध केले आहे. यामध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित प्रचार सामग्री प्रसारित करून सदस्यांची भरती केली जाते. अबू हाजीर अल्-बद्री हा इस्लामिक स्टेटच्या सायबर युनिटचा एक प्रमुख ऑपरेटर आहे. तो ‘व्हॉईस ऑफ हिंद’चे दक्षिण भारतीय भाषांमध्ये भाषांतर आणि त्याच्या प्रचारामध्ये सहभागी आहे.