श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू वाराणसी येथे येणार असल्याचे कळल्यावर आनंद होणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू वाराणसी येथे येणार असल्याचे समजल्यावर पुष्कळ आनंद होणे

‘११.८.२०२० या दिवशी ईश्वराच्या कृपेने ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू वाराणसी येथे येणार आहेत’, असे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला; परंतु त्यांना आम्ही रहातो तेथे येणे शक्य नसल्याचे कळल्यावर मनाला दुःख झाले. मी मंदिरात जाऊन श्रीरामाला प्रार्थना केली, ‘हे भगवंता, आमच्याकडून कोणती मोठी चूक झाली की, त्या इथपर्यंत येऊनही आम्हाला त्यांचा लाभ घेता आला नाही ?’ काही दिवसांनी कळले की, त्या आम्ही रहातो तेथे येणार आहेत. हे ऐकल्यावर पुन्हा आनंद होऊन मन आनंदाने भरून आले. माझी प्रार्थना श्रीरामाच्या चरणापर्यंत पोचली; म्हणून त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू वाराणसी येथे येणार त्या दिवशी ‘सकाळपासूनच दीपावली आहे’, असे वाटणे आणि सर्वांनाच आनंद होणे

ज्या दिवशी वाराणसी येथे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू येणार होत्या, त्या दिवशी ‘सकाळपासूनच दीपावली आहे’, असे वाटत होते. आम्ही राहतो तेथे विहीर आहे. ‘त्या विहिरीच्या पाण्यात साक्षात् गंगामाता येऊन उभी आहे’, असे प्रतिबिंब मला दिसले. मी कळत नकळत तिच्या चरणी नतमस्तक झाले आणि कानात शब्द पडले की, मी इथे आले आहे. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू येथे येणार; म्हणून सर्व साधक आनंदाने वावरत होते. ‘जगदंबाच येणार आहे’, असा भास होत होता.

३. ‘वाराही यज्ञा’च्या वेळी पुष्कळ दाब जाणवणे, श्रीरामाचा तोंडवळाही अतिशय उग्र वाटणे आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकूंचे रूप पहातांना ‘साक्षात् दुर्गामाता बसली आहे’, असे जाणवणे

या वेळी करण्यात आलेल्या ‘वाराही यज्ञा’ला आम्ही सर्व साधक बसलो होतो. यज्ञ चालू झाला, त्या वेळी वातावरणात पुष्कळ दाब जाणवत होता. ‘श्रीराममंदिरात काळोख झाला आहे’, असे जाणवत होते. श्रीरामाचा तोंडवळा अतिशय उग्र वाटत होता. यज्ञ चालू असतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकूंचे रूप पहातांना ‘साक्षात् दुर्गामाता बसली आहे’, असे मला जाणवत होते.

४. यज्ञाला बसल्यावर तिथे चक्र फिरत असल्याचे जाणवणे आणि त्यामुळे शरिराला जडत्व येणे

मी यज्ञाला जिथे बसले होते, तिथे खाली ‘एक चक्र फिरत आहे’, असे वाटले. ते चक्र मला वर फेकत होते आणि मधे-मधे खाली खेचत होते. त्यामुळे माझ्या शरिराला जडत्व जाणवत होते आणि मनही थोडे विचलित झाले होते.

५. श्री वाराहीदेवीला प्रार्थना केल्यावर तिचे अस्पष्ट दर्शन होणे

श्री वाराहीदेवीला प्रार्थना करायला सांगितल्यावर ‘मी कुठेतरी भुयारात आहे आणि त्या भुयारात पाषाण आहेत’, असे जाणवले. त्या पाषाणातील शाळीग्रामात ‘ती देवता उभी आहे’, असे सुस्पष्ट दिसत नव्हते. मी प्रार्थना करून दर्शन घेण्याचा प्रयत्न केल्यावर देवीने थोडे दर्शन दिले.

६. सैनिकांसाठी भारतमातेला प्रार्थना करणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू मार्गदर्शन करत असतांना म्हणाल्या, ‘‘आपण सर्व साधक म्हणजे सीमेवरचे सैनिक आहोत.’’ त्या वेळी सैनिकांसाठी भारतमातेला ‘त्यांना आपला भारत देश लढून लढून घेण्याची सद्बुद्धी होऊ दे. जगदंबामाते तूच त्यांच्या पाठीशी उभी रहा’, अशी माझ्याकडून प्रार्थना झाली.

‘गुरुदेवा, तुमच्या कृपाशीर्वादाने या अनुभूती आल्या. त्यामुळे तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– श्रीमती भाग्यश्री आणेकर, वाराणसी (ऑगस्ट २०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक