महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्येविषयी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले !

खड्ड्यांच्या प्रश्नी आम्ही काही करण्यापूर्वी तुम्ही पावले उचला !

रस्त्यांच्या कामांविषयी न्यायालयाला सातत्याने सांगावे लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! – संपादक 

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होत आहे. लोकांचा वेळ प्रवास करण्यात वाया जात आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन लोकांना जीव गमवावा लागत आहे. याप्रश्नी आम्ही काही करण्यापूर्वी तुम्ही पावले उचला, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकार यांना दिले आहेत. एका ‘सीआर्एड्’ प्रकरणाच्या न्यायालयीन प्रकरणाच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी स्वत:हून मुंबई-गोवा आणि मुंबई-नाशिक या महामार्गांच्या दूरवस्थेची नोंद घेत सरकारला याविषयी विचारणा केली. या वेळी ‘आतातरी ही समस्या गांभीर्याने घ्यावी’, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला होत असलेल्या विलंबाविषयी यापूर्वी न्यायालयाने राज्य सरकारकडे विचारणा केली होती. ‘महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत अन्य कोणत्याही विकास प्रकल्पाला प्रारंभ करण्यासाठी अनुमती देणार नाही’, अशी चेतावणी यापूर्वी न्यायालयाने सरकारला दिली आहे.