हिंदु राष्ट्र सेना हिंदु युवकांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यास कटीबद्ध ! – मोहन तिवारी, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, हिंदूराष्ट्र सेना

पाळधी (जिल्हा जळगाव) येथे हिंदु राष्ट्र सेनेच्या बैठकीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

जळगाव, २४ सप्टेंबर (वार्ता.) – आजच्या युवकांना संघटित रहाण्याची आवश्यकता आहे. गाव, शहर पातळीवरील युवक संघटित नाहीत. ते पक्ष आणि संप्रदाय यांत विभागले गेले आहेत. हिंदु राष्ट्र सेना युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन उभे करेल. ‘हिंदु राष्ट्र सेना’ हा कुठला पक्ष नसून एक संघटना आहे. जो लोकप्रतिनिधी हिंदु धर्माचे कार्य करेल, हिंदूंना साहाय्य करेल, त्यालाच यापुढे नवयुवक मतदान करतील. तसेच येणारा काळ हा आपत्काळ आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्र सेना हिंदु युवकांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यास कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री. मोहन तिवारी यांनी केले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी पाळधी (जळगाव) येथील गायत्री माता मंदिरात नुकतीच हिंदूराष्ट्र सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. या बैठकीस हिंदु युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी नवयुवक जिल्हाध्यक्ष श्री. नीलेश आबा सपकाळे, तसेच अधिवक्ता आघाडी जिल्हा समन्वयक श्री. निरंजन चौधरी यांनी उपस्थितांना संबोधित केले. बैठकीला ४०० युवक, हिंदु राष्ट्र सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.