हिंदू सहिष्णु असल्यामुळे हिंदु धर्म आणि देवता यांचा अवमान करणार्या ‘फॅशन शो’चे आयोजन होणे, हे गंभीर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन होणे, हे लज्जास्पद आहे. हिंदूंनो अशा कार्यक्रमांना संघटितपणे वैध मार्गाने विरोध होणे अपेक्षित होते ! – संपादक
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
पुणे, २४ सप्टेंबर – येथील सहकारनगर भागातील सातव सभागृहात २३ सप्टेंबर या दिवशी तृतीयपंथियांच्या ‘अर्धनारी नटेश्वर’ या नावाने ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते. ‘फोरफॉक्स प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने या ‘फॅशन शो’साठी पुढाकार घेतला होता. पुणे आणि इतर शहरातील तृतीयपंथीय ‘मॉडेल्स’नी या ‘फॅशन शो’मध्ये ‘रॅम्प वॉक’ केला. यामध्ये एका तृतीयपंथीयाला भगवान शंकराच्या वेशात दाखवण्यात आले होते. (अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या देवतांना या ‘फॅशन शो’मध्ये दाखवण्याचे धारिष्ट्य आयोजकांनी दाखवले असते का ? – संपादक)
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले की, कोरोना काळात इतरांप्रमाणे तृतीयपंथियांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून त्याकडे लक्ष वेधण्याचा या ‘फॅशन शो’च्या माध्यमातून प्रयत्न केला आहे, तसेच तृतीयपंथियांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळावी आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, हा ‘फॅशन शो’ आयोजित करण्यामागील उद्देश आहे.