‘एका कुटुंबात एक उमेदवार’ हे भाजपचे धोरण असेल; परंतु यापूर्वी त्याला काही अपवाद होते ! – देवेंद्र फडणवीस 

देवेंद्र फडणवीस

पणजी, २० सप्टेंबर (वार्ता.) – सर्वसाधारणपणे ‘एका कुटुंबामध्ये एक उमेदवार’ असे भाजपचे धोरण आहे; परंतु भूतकाळात याला काही अपवाद होते, असे विधान भाजपचे गोव्यातील प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वर्ष २०२२ मध्ये गोव्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे धोरण ठरवण्यासाठी ते सध्या इतर काही राष्ट्रीय नेत्यांसमवेत गोव्यात आले आहेत.

या वेळी ते म्हणाले, ‘‘निवडणुकीपूर्वी इतर पक्षांशी युती करण्यासंबंधीचा निर्णय भाजपच्या विधानसभा मंडळाकडून घेतला जाईल. गोव्यात जिल्हा परिषद निवडणुकीत आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपला जनतेकडून मिळालेला पाठिंबा पहाता वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताने जिंकेल, असा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्रीपदासाठी कोण उमेदवार असेल, याविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विधानसभा मंडळ घोषणा करतील.’’ या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यानंतर गोव्यातील मुख्यमंत्री पद यशस्वीपणे सांभाळल्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कौतुक केले.

भाजपमध्ये मतभेद आहेत;परंतु बंडखोरी नाही ! – देवेंद्र फडणवीस

भाजपमध्ये बंडखोरी आहे का ? या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले, ‘‘वस्तूस्थिती तशी नाही. भाजपमध्ये मतभेद असू शकतात; परंतु बंडखोरी नाही. भाजप एक पक्ष म्हणून किंवा भाजपचे सरकार एकत्रितपणे कार्य करेल. मुख्यमंत्री, सर्व इतर मंत्री, कार्यालयीन अधिकारी आणि कार्यकर्ते ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी एकत्रितपणे काम करतील.’’ या वेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे गोवा राज्याचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.