हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर मराठवाड्यातील समितीच्या कार्यकर्त्यांसाठी ‘ऑनलाईन संपर्क कौशल्यवृद्धी कार्यशाळा’ पार पडली !

जळगाव, ८ सप्टेंबर (वार्ता.) – ‘जनप्रबोधनाच्या दृष्टीने समाजातील विविध घटकांना संपर्क कसे करावेत’ याविषयीचे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते कार्यशाळेच्या प्रारंभी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना बोलत होते. समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये संपर्क करण्याच्या दृष्टीने कौशल्यवृद्धी होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन संपर्क कौशल्यवृद्धी कार्यशाळा’ २९ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ ते ३.३० या वेळेत आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकिशोर जाधव म्हणाले, ‘‘संपर्क करण्याच्या सेवेतून ईश्वरी गुण अंगी बाणवता येतात. त्यामुळे ही महत्त्वाची सेवा आहे.’’ या कार्यशाळेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. घनवट या वेळी म्हणाले की, समाजातील अधिवक्ता, डॉक्टर, शिक्षक, धर्मप्रेमी, मंदिरांचे विश्वस्त यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घेण्याच्या अनुषंगाने संपर्ककौशल्य आवश्यक आहे.