‘मोदी एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेगाडीने मुंबईहून गणेशभक्त कोकणात दाखल !

प्रवास आणि एक वेळचे जेवण दिले विनामूल्य !

कणकवली – भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गणेशभक्तांसाठी कोकण रेल्वेमार्गावरून ७ डिसेंबरला दादर, मुंबई येथून सोडलेल्या ‘मोदी एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेगाडीने १ सहस्र ८०० प्रवासी कोकणात दाखल झाले. या गाडीतील प्रवाशांना विनामूल्य प्रवासासह एकवेळचे जेवण आणि पाणीही विनामूल्य देण्यात आले होते.

प्रत्येक वर्षी आमदार राणे हे गणेशभक्तांसाठी मुंबईतून खासगी बसगाड्या सोडतात. यावर्षी बसगाड्यांऐवजी रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय राणे यांनी घेतला होता. त्यानुसार ७ सप्टेंबरला सकाळी १० वाजता दादर (मुंबई) रेल्वेस्थानकावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी विलंबाने ही गाडी कणकवली रेल्वेस्थानकात पोचली. या गाडीने आलेल्या प्रवाशांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले, तसेच कणकवली रेल्वेस्थानकाहून कणकवली बसस्थानक आणि देवगड बसस्थानक येथपर्यंत प्रवाशांना सोडण्यासाठी विशेष गाड्यांचीही सोय करण्यात आली होती.