‘सनातन आश्रम, रामनाथी येथील कला मंदिराच्या चित्रीकरण कक्षात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवासाठी त्यांच्या श्री सत्यनारायण रूपातील दर्शन सोहळ्याच्या सिद्धतेसाठी झोपाळा केला होता. माझे वजन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वजनाइतके असल्यामुळे सरावासाठी मला झोपाळ्यावर बसण्यास सांगितले. या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ झोका देण्याचा सराव करण्यासाठी चित्रीकरण कक्षात आल्या होत्या. हा सराव करण्यासाठी त्यांनी ‘विष्णुवैभवम्, विश्वरक्षकम्…’ ही भगवान श्रीविष्णूची स्तुती म्हटली. हा सराव चालू केला, तेव्हा काही क्षणांतच माझे डोळे आपोआप मिटले गेले. मन शांत, निर्विचार आणि ‘प.पू. डॉक्टर’ या नामजपात लीन झाले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ यांच्या व्यतिरिक्त मनात अन्य काहीच नव्हते. या वेळी खोल समुद्राच्या संथ आणि शांत लाटांवर मी तरंगत असल्याची अनुभूती मला येत होती. माझ्या आजूबाजूला सर्वत्र निळसर प्रकाश जाणवत होता.
ही स्थिती काही काळ टिकल्यानंतर मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तीव्रतेने आठवण येऊन भावजागृती होऊ लागली. या स्थितीत काही क्षण जाताच मला ‘मी प्रल्हाद आहे’, अशी जाणीव मला होऊ लागली. भगवंताने प्रल्हादाच्या प्रार्थनेला साक्षात् नृसिंहाच्या अवतारात प्रकट होऊन दिलेल्या साक्षीविषयी मनात कृतज्ञता दाटून आली. ‘प्रल्हादाच्या रूपात मी कुठेतरी अतिशय निश्चिंत आणि आनंदात बसलेलो आहे’, अशी जाणीव होत होती. या वेळी जसजसे दृश्य विस्तृत होत गेले, तसतसे मझ्या लक्षात आले की, साक्षात् नृसिंहाच्या अवतारातील भगवंताच्या मांडीवरच त्याने मला बसवून घेतलेले आहे. या वेळी कृतज्ञतेने मला भरून आले. ‘ही स्थिती संपूच नये’, अशी जाणीव मनाला होत होती.
भगवंताच्या मांडीवर बसण्याची अनुमती त्याने या अनुभूतीच्या माध्यमातून दिली, हेही माझे भाग्यच आहे. यासाठीसुद्धा गुरुदेव, आपल्या चरणी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, ती अल्पच आहे. ‘आपल्याला अपेक्षित अशी सेवा आणि साधना या जिवाकडून करवून घ्यावी’, अशी आपल्या चरणी विनम्र प्रार्थना आहे !’
– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जुलै २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |