ही स्थिती गोवा पोलिसांसाठी लज्जास्पद ! असे उत्तर न्यायालयात द्यायला संबंधितांना लाजही कशी वाटली नाही ? असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक
पणजी, २१ ऑगस्ट (वार्ता.) – ‘डेसीबल मीटर’ (ध्वनीची मर्यादा तपासण्याचे उपकरण) नादुरुस्त झाल्याने हणजुणे पोलीस ध्वनीप्रदूषण करणार्या ‘रेव्ह पार्ट्यां’वर कारवाई करू शकत नाही, अशी माहिती पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली. हणजुणे-वागातोर समुद्रकिनारपट्टीवर रात्रीपासून दुसर्या दिवशी सकाळपर्यंत रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये होत असलेल्या ध्वनीप्रदूषणावर कोणतेच नियंत्रण नसते, अशा आशयाची जनहित याचिका गोवा खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी पोलिसांनी ही माहिती दिली.
Anjuna cops blame broken decibel meter for failure to check noise pollution https://t.co/Rtbvml4Vpq
— TOI Goa (@TOIGoaNews) August 19, 2021
पोलीस न्यायालयाला म्हणाले, ‘‘हणजुणे पोलिसांना देण्यात आलेला ‘डेसीबल मीटर’ नादुरुस्त झालेला आहे आणि तो दुरुस्तीसाठी पाठवण्यात आला आहे. हा ‘डेसीबल मीटर’ दुरुस्त होऊ शकत नाही, असे ‘डेसीबल मीटर’ दुरुस्त करणार्या आस्थापनाने ऑक्टोबर २०१९ मध्ये पोलिसांना कळवले. (यातून पोलीस खाते एकतर निष्क्रीय आहे किंवा पोलीस अधिकार्यांचे रेव्ह पार्ट्या करणार्यांशी साटेलोटे आहे , हेच यातून लक्षात येते. त्यामुळे अशी बालीश उत्तरे न्यायालयात दिली जातात. ‘डेसीबल मीटर’ दुरुस्त होऊ शकत नाही, हे २ वर्षांपूर्वी कळूनही तो नवीन का घेतला नाही ? उद्या पोलीस कोठडीत जागा नाही; म्हणून गुन्हेगारांना मोकाट सोडले आहे, असेही हे पोलीस सांगतील. न्यायालयाने यावर कठोर निर्णय घ्यायला हवा ! – संपादक)