रक्षाबंधनाच्या निमित्ताने सांगली येथे विक्रेते आणि नागरिक यांचे भारतीय राख्यांना प्राधान्य !

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली, २० ऑगस्ट (वार्ता.) – चीन सातत्याने भारतावर विविध माध्यमांतून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बहुतांश व्यापार्‍यांनी चिनी साहित्यावर बहिष्कार टाकला आहे. २२ ऑगस्टला असलेल्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साह दिसून येत असून विक्रेते आणि नागरिक यांनी भारतीय राख्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. यात स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या राख्या विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

चीन समवेत गलवान खोरे येथे झालेल्या संघर्षानंतर ‘कॅट’ (कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) या व्यापार्‍यांच्या देशव्यापी संघटनेने चिनी वस्तूंच्या विरोधात मोहीम चालू केली आहे. घाऊक, तसेच किरकोळ व्यापार्‍यांनी स्वदेशी वस्तूंनाच विक्रीसाठी प्राधान्य द्यावे, यासाठी ‘कॅट’चे प्रयत्न आहेत. ‘कॅट’शी देशभरातील ४५ संघटना जोडल्या असून ‘मेड इन इंडिया’च्या उत्पादनांना प्राधान्य देण्यात येत आहे.

नागरिकांनी स्थानिक राख्याच खरेदी कराव्यात ! – अतुल शहा, उपाध्यक्ष, कॅट

या संदर्भात ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा म्हणाले, ‘‘रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर घाऊक व्यापार्‍यांनी चिनी बनावटीच्या राख्या खरेदी केलेल्या नाहीत. स्वदेशी राख्यांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. नागरिकांनीही देशाला सक्षम करण्यासाठी स्थानिक राख्या खरेदी कराव्यात.’’