राष्ट्रध्वज उलटा फडकावल्याच्या प्रकरणी केरळमध्ये भाजप नेत्यावर गुन्हा नोंद

भाजपचे केरळ शाखेचे प्रमुख के. सुरेंद्रन् ध्वजारोहण करताना

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथे पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळी राष्ट्रध्वज उलटा फडकावल्याच्या प्रकरणी केरळ पोलिसांनी भाजपचे केरळ शाखेचे प्रमुख के. सुरेंद्रन् यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. याविषयी के. सुरेंद्रन् म्हणाले की, माझ्यावर राजकीय हेतूने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रध्वज फडकावतांना अर्ध्यावर आम्हाला आमची चूक लक्षात आली आणि ती सुधारली; पण अनेक साम्यवादी कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला.

माकप कार्यालयात राष्ट्रध्वज हा पक्षाच्या झेंड्याच्या समान पातळीवर फडकावून ध्वज संहितेचे उल्लंघन

राज्यात माकपचीच सत्ता असल्याने माकपच्या कार्यर्त्यांवर गुन्हा प्रविष्ट होणार नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक

माकपच्या थिरूवनंतपूरम् येथील कार्यालयात राष्ट्रध्वज माकपच्या झेंड्याच्या समान पातळीवर फडकावण्यात आला

दुसरीकडे सत्ताधारी माकप पक्षाने पहिल्यांदाच त्याच्या पक्ष कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकावला; मात्र यावरून टीकाही होऊ लागली आहे. काँग्रेसचे नेते के.एस्. सबरीनाथन् म्हणाले की, माकपच्या थिरूवनंतपूरम् येथील कार्यालयात राष्ट्रध्वज माकपच्या झेंड्याच्या समान पातळीवर फडकावण्यात आला. हे राष्ट्रीय ध्वजसंहितेचे उल्लंघन आहे. ध्वजसंहितेनुसार, इतर कोणताही ध्वज किंवा झेंडा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा समान स्तरावर फडकवला जाऊ शकत नाही.

याविषयी भाजपनेही टीका करतांना ‘माकप पक्षाच्या झेंड्याच्या समान पातळीवर राष्ट्रध्वज फडकवणार्‍या सचिवांविरोधात गुन्हा नोंदवला गेला पाहिजे’, अशी मागणी केली; मात्र माकपने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.