शैक्षणिक शुल्काचा अपहार केल्यामुळे वडूज (जिल्हा सातारा) येथील शिक्षकावर गुन्हा नोंद !

असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा झाल्यासच अन्य कुणी, असे वागण्याचे धाडस करणार नाही. – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सातारा, १४ ऑगस्ट (वार्ता.) – वडूज (जिल्हा सातारा) येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील उपशिक्षक आनंदा विठोबा जगदाळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा अपहार केला आहे. यामुळे त्यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याविषयी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष २०१९-२० या कालावधीत उपशिक्षक जगदाळे हे महाविद्यालयात १० वी कचे वर्गशिक्षक होते. या वर्गाचा पट ६३ होता. त्यापैकी २ विद्यार्थ्यांचे शुल्क घेतले नव्हते; मात्र ६१ विद्यार्थ्यांचे १ सहस्र रुपयांप्रमाणे ६१ सहस्र रुपये महाविद्यालयातील विविध परीक्षा आणि उपक्रमांचे शुल्क म्हणून जगदाळे यांनी विद्यार्थ्यांकडून जमा केले होते; मात्र ही रक्कम जगदाळे यांनी संबंधितांकडे जमा न करता वैयक्तिक लाभासाठी उपयोगात आणली. याविषयी जगदाळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन जमा शुल्क देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे गोडसे यांनी नाईलाजास्तव पोलिसात गुन्हा नोंद केला.