नवी देहली – भारताच्या तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन् यांची आर्.ई.सी.ए.ए.पी.चे (रिकॅप : ‘द रिजनल कोऑपरेशन ॲग्रीमेंट ऑन कॉम्बेटींग पायरसी’चे) कार्यकारी संचालक म्हणून निवड झाली आहे. या संस्थेचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे. आशिया खंडात समुद्रमार्गे वाहतूक करतांना जहाजांवर समुद्री चाचे (समुद्रामध्ये चोरी, तस्करी करणारे) दरोडे घालून ते लुटतात. ते रोखण्याचे दायित्व नटराजन् यांच्यावर असणार आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताचे उमेदवार नटराजन् यांना २१ सदस्य देशांपैकी १४ देशांची मते मिळून बहुमत मिळाले. त्यांनी चीन आणि फिलिपिन्स या देशांच्या उमेदवारांचा पराभव केला. चीनच्या उमेदवाराला ४ आणि फिलिपिन्सच्या उमेदवाराला ३ मते मिळाली. म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, जपान या आशियाई देशांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, तसेच युरोपमधील डेन्मार्क, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड आणि नॉर्वे यांनीही भारताला मत दिले.