संगणकावर ‘गेम’ खेळण्याचा आणि त्यात भवितव्य (करियर) घडवण्याचा तरुणाईचा वाढता कल !

‘इंडिया गेमिंग लॅन्डस्केप’ आस्थापनाच्या सर्वेक्षणातील माहिती

  • संगणकीय खेळ खेळल्याने मनावरील ताण अल्प होत असल्याचे तरुणांचे मत !

  • ८७ टक्के पुरुष, तर ९१ टक्के महिला यांना ‘ऑनलाईन’ खेळाची आवड !

  • असे गेम खेळल्यामुळे अनेकांना मानसिक व्याधींनी ग्रासले आहे. ‘वारंवार संगणकीय खेळ खेळल्यामुळे स्वभाव एकलकोंडा, रागीट आणि चिडचिडा होतो’, असे अनेक मानसोपचारतज्ञांनी सांगितले आहे. आध्यात्मिक स्तरावरही अशा खेळांचा व्यक्तीवर नकारात्मक परिणाम होतो ! – संपादक 
  • तरुण पिढीला धर्मशिक्षण न दिल्यामुळेच ती संगणकीय खेळ खेळण्याच्या विकृतीकडे ओढली गेली आहे. ‘साधना करणे’ हाच आनंदी जीवन जगण्याचा आणि सकारात्मक, तसेच तणावरहित विचार करण्याचा मूलमंत्र आहे’, हे तरुणाईवर बिंबवले पाहिजे. तरुणांनी साधना करावी, यासाठी शासनाने व्यापक स्तरावर व्यवस्था करणे आवश्यक आहे ! – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे असणार्‍या एच्.पी. (हेवलेट पॅकार्ड) ‘इंडिया गेमिंग लॅन्डस्केप’ या आस्थापनाने राज्यातील प्रमुख शहरांत संगणकीय खेळ (कम्प्युटर गेम) खेळण्याच्या संदर्भात सर्वेक्षण केले आहे. यामध्ये ‘पुरुषांच्या तुलनेत महिलांना संगणकावर खेळ खेळण्याची आणि त्यातच भवितव्य (करिअर) करण्याची आवड अधिक आहे’, अशी माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात ‘८७ टक्के पुरुष, तर ९१ टक्के महिला यांना अशा खेळांत आवड आहे’, अशी माहिती पुढे आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून ‘ऑनलाईन’ खेळ खेळण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ‘इंडिया गेमिंग लॅन्डस्केप’ या आस्थापनाने केलेल्या सर्वेक्षणात नागपूरमधील ९६ टक्के ‘ऑनलाईन’ खेळ खेळणार्‍यांना यात भवितव्य घडवायचे आहे. मुंबई येथे हे प्रमाण ९५ टक्के, तर पुणे येथे ७५ टक्के आहे. संगणकीय खेळ खेळण्यासाठी संगणक खरेदी करण्याचे प्रमाण मुंबई येथे ७८ टक्के, नागपूर येथे ६५ टक्के, तर पुणे येथे ५३ टक्के आहे.