पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातारा जिल्हा सीमेत खड्डेचखड्डे !

रस्त्यावर परत परत खड्डे का पडतात, याचे मूळ कारण शोधणे अपेक्षित आहे, तसेच त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना काढावी.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर नवा खड्डा बुजवेपर्यंत दुसरा नवा खड्डा निर्माण होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शेंद्रे ते शिरवळपर्यंत खड्ड्यांची मालिकाच चालू आहे.

महामार्गावरील खड्ड्यांमुळे मोठ्या गाड्यांचे पाटे तुटत आहेत, चारचाकीचे टायर फुटत आहेत, रिमा तुटत आहेत, दुचाकींचे अपघात होत आहेत. यामुळे व्हिल अलायमेंटवाले आणि पंक्चरवाले पैसे कमवत असले, तरी सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेतून १२५ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरील काही ठिकाणचे ३ पदरीकरणाचे काम राहिले आहे; मात्र ज्या ठिकाणचे ३ पदरीकरणाचे काम झाले आहे, त्याठिकाणी खड्डेचखड्डे निर्माण झाले आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पेव्हर्स टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो पूर्णत: यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे आता शहरातील सामाजिक संघटना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलनाच्या सिद्धतेत आहेत.

अधिकारी संपर्कक्षेत्राच्या बाहेर

राष्ट्रीय महामार्गावरील समस्येविषयी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे कार्यालय पुणे येथे आहे; परंतु संबंधित अधिकारी संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याचा संदेश त्यांना मिळत आहे.