अतीवृष्टीमुळे कोसळलेल्या मल्हार पुलाच्या ठिकाणी श्री गणेशचतुर्थीपूर्वी तातडीने छोटा पूल उभारा ! – कनेडी पंचक्रोशीतील सरपंचांची मागणी

प्रशासनाच्या आतापर्यंतच्या कूर्मगतीने काम करण्याच्या अनुभवामुळेच ग्रामस्थांना अशी मागणी करावी लागते !

        

कणकवली – अतीवृष्टीमुळे कोसळलेल्या तालुक्यातील कनेडी-नाटळ मार्गावरील मल्हार पुलाच्या ठिकाणी श्री गणेशचतुर्थीपूर्वी तातडीने तात्पुरत्या स्वरूपाच्या साकवाची (छोट्या पुलाची) उभारणी करा, अशी मागणी कनेडी पंचक्रोशीतील सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मल्हार पूल कोसळल्याने आता नाटळ, दिगवळे, दारिस्ते, नरडवे या प्रमुख गावांसह ८-९ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

या पुलाला तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्याविषयीच्या उपाययोजनांसाठी २७ जुलैला जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगवे येथे आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मल्हार पुलाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून त्यानुसार पुलाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील साकव करणे शक्य आहे किंवा नाही, हे सांगता येईल, असे सांगितले होते. तसेच या संदर्भातील अंदाजपत्रकही त्यानंतर करणे शक्य होईल, याविषयी चर्चा झाली होती; मात्र अद्याप याविषयी कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये याविषयी साशंकता आहे. पर्यायी साकव किती दिवसांत होईल ? हेही समजत नाही. जर पुलाच्या ठिकाणी साकव करणे शक्य नसल्यास पुलाच्या जवळच भूमी उपलब्ध करून तेथे साकव बांधण्याची तात्काळ कार्यवाही करावी. त्यामुळे या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना भेडसावत असलेल्या समस्या काही प्रमाणात सुटतील. आगामी श्री गणेशचतुर्थी लक्षात घेता येथे साकव न झाल्यास मोठ्या प्रमाणात शहरातून येणार्‍या गणेशभक्तांचेही हाल होतील. त्यामुळे तातडीने येथे तात्पुरत्या स्वरूपात साकव उभारावा.

या वेळी नरडवेच्या सरपंच अमिता सावंत, नाटळच्या सरपंच सुजाता सावंत, दिगवळेच्या सरपंच सानिका सुतार, दारिस्तेचे सरपंच संजय सावंत, माजी सभापती सुरेश ढवळ आदी उपस्थित होते.