‘गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयक’ रहित न केल्यास विधेयकाच्या विरोधात राज्यभर ‘भूमीपुत्र यात्रा’ काढू ! – काँग्रेस

‘गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयक’

पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) – ‘गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयक’ पुढील १५ दिवसांत रहित न केल्यास विधेयकाच्या विरोधात राज्यभर ‘भूमीपुत्र यात्रा’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी मतदारसंघातून प्रारंभ होणार आहे. या यात्रेत किमान १० सहस्र ‘भूमीपुत्र’ सहभागी होतील, अशी चेतावणी गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

गोवा सरकारने ‘गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयका’ला नुकतीच संमती दिली आहे. या विधेयकानुसार १ एप्रिल २०१९ च्या पूर्वीपासून कोमुनिदाद, सरकारी किंवा खासगी मालकीची भूमी यांमध्ये असलेली घरे आणि घरापुरती भूमी या ठिकाणी ३० वर्षांपासून  निवास करणार्‍याच्या नावावर करण्याची तरतूद आहे. या विधेयकाला राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आदी सर्वच स्तरांतून विरोध वाढत आहे.

गोवा सरकारने अधिवेशनात घटनाविरोधी पद्धतीने १३ विधेयकांना संमती दिल्याच्या घटनेच्या विरोधात काँग्रेसकडून राज्यपालांना निवेदन सुपुर्द

गोवा सरकारने नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात ‘गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयका’सह एकूण १३ विधेयकांना घटनाविरोधी पद्धतीने संमती दिली आहे. अशा महत्त्वाच्या विधेयकांवर प्रथम विधानसभेत सखोल चर्चा होणे आवश्यक असते आणि मग विधेयक संमत करण्यासाठी मतदान घ्यायचे असते; मात्र असा प्रकार झालेला नाही. या विधेयकांवर सखोल चर्चा करण्याची सूचना राज्यपालांनी विधानसभेला द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची उपस्थिती होती.

‘आप’कडूनही राज्यपालांची भेट

‘आप’नेही राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी भेट घेऊन गोवा सरकारने विधानसभा अधिवेशनात ‘गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयका’सह अन्य विधेयकांनाही चर्चा न करता घाईघाईने संमती दिल्याचा आरोप केला. या भेटीत महिलांची सुरक्षा, ‘ऑनलाईन’ वर्ग, खाण प्रश्न आदी प्रश्नांवरही राज्यपालांशी चर्चा करण्यात आली.

  • गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयका’मध्ये ‘भूमीपुत्र’ शब्दाचा वापर केल्याने भावनांना ठेच पोचली !

  • भाजपच्या ‘अनुसूचित जमाती मोर्चा’कडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सुपुर्द

गोवा सरकारने संमत केलेल्या ‘गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयका’मध्ये ‘भूमीपुत्र’ शब्दाचा वापर केल्याने राज्यातील सर्व अनुसूचित जमातीतील लोकांच्या भावनांना ठेच पोचली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यामध्ये हस्तक्षेप करून विधेयकात आवश्यक पालट करावा’, अशी मागणी भाजपच्या ‘अनुसूचित जमाती मोर्चा’ने ३ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याविषयी भाजपचे नेते रमेश तवडकर म्हणाले, ‘‘गावडा, कुणबी, धनगर आणि वेळीप हेच खरे गोव्यातील ‘भूमीपुत्र’ आहेत. विधेयकामध्ये ‘भूमीपुत्र’ शब्दाचा वापर केल्यास गावडा, कुणबी, धनगर आणि वेळीप यांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे.’’