पुणे महापालिकेच्या चालकांच्या विरोधामुळे ‘ई-कार’ भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला !

ई-कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे – महापालिकेने अधिकारी आणि पदाधिकारी यांसाठी चालकांसह ‘ई-कार’ भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला असता, त्याला महापालिकेच्या चालकांनी विरोध केला आहे. ‘ई-कार’ भाड्याने घेतली तरी चालेल; पण चालक नको’, अशी भूमिका चालकांनी घेतल्याने हा विषय पुढे ढकलण्यात आला आहे.

१. केंद्र सरकारने ‘मे. एनर्जी ईफिसिएन्सी’ हे आस्थापन स्थापन केले असून या मोटारी भाडेतत्त्वावर पुरवण्यासाठी या आस्थापनाने महापालिकेकडे विचारणा केली होती. त्यानुसार ३८ ‘टाटा नेक्सन कार’ चालकासह ८ वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

२. ‘ई-कार’साठी महापालिकेला २३ कोटी २८ लाख ८८ सहस्र रुपये खर्च येणार आहे, तर प्रत्येक मासात १ लाख ७० सहस्र रुपयांची बचत होणार असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.

३. ‘ई-कार’ भाड्याने घेण्यापेक्षा थेट खरेदी करता येईल का ? तसेच त्यात महापालिकेच्या पैशांची बचत होऊ शकते का ? याचा आढावा प्रशासनास घेण्यास सांगितल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.