दक्षिण आफ्रिकेमध्ये भ्रष्ट माजी राष्ट्रपतींच्या अटकेनंतर हिंसाचार !

दोघा भारतियांचा घोटाळ्यात समावेश असल्याने भारतियांना केले जात आहे लक्ष्य !

‘भारतीय घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी असतात’, अशीच प्रतिमा आता जगात निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

जेकब जुमा

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब जुमा यांना कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी अटक केल्यानंतर तेथे हिंसाचार चालू झाला आहे. अनेक भागांत लूटमार चालू आहे. या हिंसाचाराचा फटका तेथील १३ लाख भारतियांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये उत्तरप्रदेशच्या सहारनपूरच्या गुप्ता बंधूंचा हात आहे. त्यांना संयुक्त अरब अमिरात येथून आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.

गुप्ता बंधूंनीच हा भ्रष्टाचार घडवून आणला आहे. त्यांनी जुमा यांच्या २ मुलांनाही लाभ मिळवून दिला आहे. यामुळेच भारतियांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत आहे. जोहान्सबर्ग आणि क्वाजुलु नटाल येथे भारतियांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे. आफ्रिकेमध्ये भारतियांची घरे, दुकाने, व्यवसाय, आस्थापने यांना पेटवले जात आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी आफ्रिकेच्या मंत्र्यांशी याविषयी दूरभाषवरून संपर्क करून चर्चा केली आहे.

‘दक्षिण आफ्रिकेच्या सरकारला आमच्या रक्षणासाठी सुरक्षादलांना पाठवण्याची विनंती केली आहे; मात्र त्याने ते पाठवलेले नाही’, असे तेथील भारतीय समुहाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.