पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांच्याकडून रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या साधिकांना शिकायला मिळालेली सूत्रे

२५.६.२०२१ या दिवशी सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावेकाका (वय ६९ वर्षे) यांनी मोर्डे, जिल्हा रत्नागिरी येथे देहत्याग केला. रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील साधिकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. वैद्य विनय भावे

सौ. राधा गावडे

१. पू. भावेकाकांनी आश्रमातील साधकांसाठी खाऊ आणल्यावर सर्व साधकांना आनंद होणे

सौ. राधा गावडे

‘माझ्याकडे रामनाथी आश्रमातील सर्व साधकांसाठी संध्याकाळचा चहा आणि अल्पाहार ठेवण्याच्या नियोजनाची सेवा आहे. ३ ते ४ वर्षांपूर्वी पू. भावेकाका अधून-मधून आश्रमात रहायला यायचे. घरून येतांना ते आश्रमातील सर्व साधकांसाठी खाऊ बनवून आणायचे. पू. काकांनी आणलेला खाऊ सर्वांसाठी खायला ठेवल्यावर साधक सांगायचे, ‘‘आजचा खाऊ पुष्कळ चविष्ट झाला आहे.’’ पू. भावेकाकांनी आणलेल्या खाऊमुळे सर्व साधकांना आनंद व्हायचा.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. भावेकाकांनी बनवलेला खाऊ खाल्ल्यावर पू. काकांचा कृतज्ञताभाव दाटून येणे

एकदा पू. भावेकाकांनी सर्वांसाठी बनवलेला खाऊ परात्पर गुरु डॉक्टरांनी खाल्ला आणि त्यांनी विचारले, ‘‘खाऊ कुणी बनवला ?’’ हा निरोप पू. काकांना दिल्यावर त्यांचा कृतज्ञताभाव दाटून आला.

३. पू. काकांनी आश्रमासाठी खाऊ बनवायला शिकवतांना केवळ त्यांचे अस्तित्व आणि चैतन्य यांमुळे लवकर शिकता येणे

रामनाथी आश्रमात लागणारा खाऊ घरी असणारे आणि बाहेर जाऊन प्रसार आदी सेवा करू न शकणारे साधक करतात. तो बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण साधकांकडे पाठवून आश्रमासाठीचा खाऊ बनवून घ्यायचो. पू. काका आश्रमात असतांना एक दिवस मला म्हणाले, ‘‘आपण आश्रमातच खाऊ बनवूया.’’ मी त्यांना सांगितले, ‘‘हो. तुम्ही मला शिकवा.’’ त्यानंतर पू. काका खाऊ बनवायला शिकवतांना ‘ते काय शिकवत आहेत’, हे माझ्या सहज लक्षात यायचे. ‘देव इथे बसला आहे, तोच मला शिकवत आहे आणि माझा आत्मविश्वास वाढवत आहे’, असे वाटून मला आनंद होत होता. ‘खाऊ कधी बनवून व्हायचा’, हे मला कळायचेही नाही. खाऊ बनवणे आणि नंतर सर्व आवरणे या सर्व शारीरिक सेवा करून ‘मी थकले’, असेही कधी झाले नाही. तेव्हा ‘केवळ पू. काकांचे अस्तित्व आणि चैतन्य यांमुळे मी खाऊ बनवण्यास लवकर शिकले’, हे माझ्या लक्षात आले.

४. पू. काकांनी खाऊ बनवायला शिकवल्यामुळे दळणवळण बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात आश्रमात खाऊ बनवू शकणे

कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदी असल्यामुळे बाहेरील साधकांकडे खाऊ बनवायला देऊ शकत नव्हतो. त्यामुळे सर्व खाऊ आश्रमातच बनवावा लागला. पू. काकांनी आधीच मला खाऊ बनवायला शिकवल्यामुळे मी दळणवळण बंदी असतांनाही आश्रमातच मोठ्या प्रमाणात खाऊ बनवू शकले. हे सर्व देवाचेच नियोजन होते आणि प्रत्यक्ष देवानेच मला शिकवले. यासाठी मी पू. भावेकाकांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ (२७.६.२०२१)

श्रीमती शिरीन चाइना

१. उजव्या पावलावर आलेली सूज आधुनिक वैद्यांच्या उपचाराने न उणावणे; मात्र पू. भावेकाकांनी केलेल्या उपचारांमुळे सूज अन् वेदना दोन्ही उणावणे

श्रीमती शिरीन चाइना

‘वर्ष २०१६ मध्ये माझे उजवे पाऊल दुखावले गेले होते. त्यामुळे मला त्या ठिकाणी पुष्कळ वेदना होत होत्या. त्याच्या उपचारासाठी मी स्थानिक आधुनिक वैद्यांकडे जात होते; मात्र त्यांच्या उपचारांनी मला बरे वाटले नाही. माझ्या उजव्या पावलाला पुष्कळ सूज आल्यामुळे मी पट्टी बांधत असे; परंतु ती सूज आणि होणार्‍या वेदना उणावत नव्हत्या. त्याच कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पू. वैद्य भावेकाकांना भेटण्याची संधी मिळाली. माझे पाऊल पाहून ते म्हणाले, ‘‘त्या ठिकाणी दूषित रक्त साचल्यामुळे तुम्हाला वेदना जाणवत आहेत. आपण तेथे जळू लावून ते दूषित रक्त काढूया.’’ त्यांच्या मार्गदर्शनानुसार मला त्या ठिकाणी २ जळवा लावण्यात आल्या आणि तेथील दूषित रक्त काढण्यात आले. त्या वेळी ४५ मिनिटे पू. भावेकाका तिथे थांबून ते मला नामस्मरणाची आठवण करून देत होते. दूषित रक्त काढण्याची प्रक्रिया आणखी ३ वेळा करण्यात आली. तेथील सर्व दूषित रक्त शोषून काढल्यानंतर त्या ठिकाणची सूज आणि जाणवणार्‍या वेदना पूर्णपणे थांबल्या. पू. भावेकाकांनी, म्हणजेच एका संतांनी माझ्यावर उपचार केले, त्यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. मी मूळची मुंबईची आहे, हे पू. भावेकाकांना कळल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘मुंबईतील आधुनिक वैद्यांना तुमच्या दुखण्याचे निदान करता आले नसते आणि त्यामुळे तुमच्यावर वेळीच योग्य उपचार होऊ शकले नसते.’’ माझ्या समस्येचे निदान वेळीच झाल्यामुळे त्यावर योग्य उपचार करता आले. माझे आयुष्य वाढवून दिल्यामुळे पू. भावेकाकांप्रतीच्या कृतज्ञताभावाने माझे हृदय भरून आले.

२. संतांनी साधकांसाठी अत्यंत प्रीतीने अल्पाहार बनवल्यामुळे आणि त्यांच्यातील (संतांमधील) चैतन्यामुळे तो स्वादिष्ट बनल्याचे लक्षात येणे

एकदा मी अल्पाहार करतांना ‘तो पदार्थ पुष्कळ स्वादिष्ट झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले. उत्सुकतेपोटी मी स्वयंपाक कक्षातील साधिकेला विचारले, ‘‘आज अल्पाहार कोणी बनवला आहे ? पुष्कळ चांगला झाला आहे.’’ त्यांनी मला तो अल्पाहार पू. भावेकाकांनी बनवला असल्याचे सांगितले. तेव्हा मला वाटले, ‘संतांनी साधकांसाठी अत्यंत प्रेमाने तो बनवला आहे आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळेही तो अल्पाहार स्वादिष्ट बनला आहे.’ त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. असे २ – ३ वेळा घडल्याचे मला आठवते.’ (२६.६.२०२१)

कु. कौमुदी जेवळीकर

कु. कौमुदी जेवळीकर

१. पू. भावेकाकांतील संतत्व अनुभवता येणे

अ. एकदा सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर पू. काकांकडे उपचारांसाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांना पू. काकांचे हात पिवळे झालेले दिसले. तेव्हा सद्गुरु (कु.) अनुराधाताई म्हणाल्या, ‘‘पू. काकांच्या हातांतून चैतन्य बाहेर पडत आहे.’’

आ. पू. भावेकाका साधकांना तपासायचे, त्या वेळी त्यांचे डोळे नेहमी बंद असायचे आणि त्यांचा नामजप चालू असायचा. मी एकदा त्यांच्याकडे गेले होते. तेव्हा ‘मला काय त्रास होतो ?’ हे त्यांनी माझी नाडी न तपासताही सांगितले होते.

इ. मी पू. काकांकडे एका उपचारासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी माझ्या हाताच्या कोपर्‍याकडील नाडी तपासली (नेहमी मनगटाजवळील नाडी तपासतात) आणि मला सांगितले, ‘‘नामजप करण्यासाठी जा. आध्यात्मिक त्रासामुळे असे होत आहे.’’ त्यांना आध्यात्मिक त्रासाची नाडी कळायची अन् त्याआधारे ते ‘त्रास शारीरिक आहे कि आध्यात्मिक ?’, हे सांगायचे.

ई. पू. काका सांगायचे, ‘‘डहाणू येथील प.पू. अण्णा करंदीकर यांना घराबाहेरून कुणी जात असेल, तर ‘त्याला काय त्रास होत आहे ?’ हे त्यांना कळायचे.’’ त्याचप्रमाणे ‘पू. भावेकाकांनाही ‘साधकांना काय त्रास होतो ?’, हे त्यांना न सांगताही कळायचे’, असे मला वाटले.

२. प्रेमभाव

त्यांच्याकडे गेल्यावर ते कधीही काही न देता पाठवायचे नाहीत. अगदी उपचारासाठीही गेलो, तरीही ते काहीतरी खाऊ द्यायचे.

३. अहंशून्यता

प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या समवेतची एक आठवण सांगतांना पू. काका म्हणाले, ‘‘एकदा प.पू. भक्तराज महाराज यांचा भंडारा होता. दुसर्‍या दिवशी भंडारा होता, तरीही आचारी आला नव्हता. बाबांनी सर्वांना सांगितले, ‘‘माझा आचारी अजून यायचा आहे.’’ मी तिथे गेल्यावर प.पू. बाबा म्हणाले, ‘‘माझा आचारी आला.’’ या प्रसंगात ‘ते इतके नामांकित वैद्य असूनही त्यांना त्याचे काहीच वाटले नाही’, हे मला शिकायला मिळाले.’ (२७.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक