प.पू. भक्तराज महाराज यांची निस्सीम भक्ती करणारे कै. नारायण रखमाजी चौधरी !

‘नारायणगाव येथे रहात असतांना मी अधूनमधून मनोहर बागेत श्री. शशिकांत ठुसेकाका यांच्या भेटीला आणि प.पू. काणे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असतो. २ वर्षांपूर्वी एकदा असेच दर्शनाला गेल्यावर ठुसेकाकांनी प.पू. भक्तराज महाराज यांचे निस्सीम भक्त श्री. नारायण चौधरीकाका यांची ओळख करून दिली. चौधरीकाकांचे आशीर्वाद घेऊन मी आणि ठुसेकाका त्यांच्या घरी बोलत बसलो. त्या वेळी ठुसेकाकांनी चौधरीकाकांविषयी पुढील माहिती सांगितली.

कै. नारायण रखमाजी चौधरी

१. श्री. शशिकांत ठुसे यांनी श्री. नारायण चौधरीकाका यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे

डॉ. राहुल दवंडे

१ अ. प.पू. बाबांचे आज्ञापालन करणे आणि त्यांच्यावर दृढ श्रद्धा असणे : ठुसेकाका म्हणाले, ‘‘नारायणकाका प.पू. बाबांचे निस्सीम भक्त आहेत. प.पू. बाबांच्या समवेत ते नारायणगाव येथील ६ एकर शेतात रहात असत. प.पू. बाबांनी त्यांना ‘आपण दोघे ६ एकरवर राहू’, असे सांगितल्यावर ते घरदार सोडून प.पू. बाबांच्या समवेत राहू लागले. प.पू. बाबांनी देह ठेवल्यानंतरसुद्धा ते तेथे एकटे रहात. ‘प.पू. बाबा माझ्या समवेतच आहेत’, असा त्यांचा भाव होता. या २५ वर्षांत ते सहा एकरवरून कुठेही गेले नाहीत. ते घरीही गेले नाहीत. अगदी पोटच्या मुलाच्या दशक्रिया विधीलाही गेले नाहीत. किती गुरूंवर श्रद्धा !

१ आ. ते नेहमी प.पू. बाबांच्या छायाचित्राशी बोलत असत.

१ इ. त्यांना कसलीही आवड-नावड नव्हती. त्यांना कोणत्याही गोष्टीची आसक्ती नव्हती.

१ ई. ‘आपल्यामुळे दुसर्‍याला कुणालाही कसलाही त्रास होऊ नये’, याची ते काळजी घेत.’’

२. श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला त्यांच्या आजारपणात २ – ३ वेळा त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली.

२ अ. अन्नाचा त्याग करणे : त्यांचे जेवण अत्यल्प होते. शेवटच्या काळात त्यांनी अन्नाचाही त्याग केला होता. असे असूनही त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. त्यांना अन्न ग्रहण करण्याच्या संदर्भात पुष्कळ जणांनी सांगितले; पण ‘त्यांनी देह त्यागण्याच्या संदर्भात निर्णय घेतला होता’, असे जाणवायचे.

२ आ. काकांच्या खोलीत प्रसन्न वाटणे, त्यांची सेवा करतांना ‘आपण सेवा करत आहोत’, असे न वाटणे आणि दुसर्‍या दिवशी त्यांनी देह ठेवणे : १८.२.२०२० या दिवशी सकाळी श्री. ठुसेकाकांचा भ्रमणभाष आला, ‘‘नारायणरावांनी अन्नत्याग केला आहे. एकदा त्यांना तपासून घ्या.’’

श्री. ठुसेकाकांच्या निरोपानुसार मी सकाळी ९.३० वाजता मनोहर बागेत गेलो. नारायणकाकांच्या खोलीत गेल्यावर मला प्रसन्न वाटत होते. त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. श्री. निंबारकर यांच्या साहाय्याने काकांचे ‘डायपर’ पालटण्याची सेवा मिळाली. सेवा करतांना ‘आपण सेवा करत आहोत’, असे मला जाणवत नव्हते. काकांचे दर्शन घेऊन मी घरी आलो. तत्पूर्वी ठुसेकाकांशी बोलतांना त्यांनी ‘नारायणकाका देहत्याग करतील’, असे सांगितले. ईश्वरी इच्छेनुसार त्यांनी दुसर्‍या दिवशी देह ठेवला.

प.पू. बाबांच्या एका निस्सीम भक्ताची, एका संतांची सेवा करण्याची संधी परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने मिळाली, त्याविषयी त्यांच्या चरणांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

३. नारायण चौधरीकाकांकडून शिकायला मिळालेले गुण

नारायण चौधरीकाकांकडून साधी रहाणी, निस्सीम भक्ती, गुर्वाज्ञा प्रमाण असणे, श्री गुरूंशी अनुसंधान असणे, श्री गुरूंसाठी सर्वस्वाचा त्याग करणे आदी गुण मला शिकायला मिळाले.’

– डॉ. राहुल दवंडे, नारायणगाव (२०.६.२०२०)