बलात्काराचा आरोपी पळ काढत असल्यास पोलिसांना गोळीबार करावाच लागेल ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराने पळ काढला आणि त्याने पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल; परंतु छातीवर नाही. कायद्याने म्हटले आहे, ‘तुम्ही पायावर गोळी मारू शकता’, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पोलिसांच्या बैठकीत केले. ‘आम्हाला आसाम पोलिसांना देशातील सर्वोत्कृष्ट दल बनवायचे आहे’, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, काही लोकांनी मला सांगितले की आजकाल गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यातून पळ काढत आहेत आणि चकमकीसारख्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे एक ‘पॅटर्न’ (प्रकार) बनत आहे का? मी त्यांना ‘गुन्हेगार पळून जात असेल, तर असे (गोळीबार करण्यासारखे ) ‘पॅटर्न’ असायला हवे’, असे सांगितले.

गोतस्करांना सोडणार नाही !

मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, गाय आमची माता आहे. ती आम्हाला दूध देते, शेण देते. ट्रॅक्टर येण्यापूर्वी आम्ही तिच्या साहाय्याने शेती केली होती आणि आजही गायींद्वारे अनेक राज्यांमध्ये शेती केली जात आहे. आता लोक पशूंची तस्करी, अमली पदार्थांची तस्करी यांत सहभागी झाले आहेत. त्यांच्यापैकी कुणालाही सोडणार नाही.