|
देहली – हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मोनिका अरोडा आणि अधिवक्ता अश्विनी दुबे यांना ‘संविधान के रक्षक’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ६ जुलै या दिवशी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या वेळी सर्वाेच्च न्यायालयात कार्यरत असलेले अधिवक्ता आणि भारतातील विविध सामाजिक अन् राष्ट्रीय समस्यांवर याचिका प्रविष्ट करणारे भाजपचे नेते आणि अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांना ‘श्यामा प्रसाद मुखर्जी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भाजपचे नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. कपिल मिश्रा यांच्या ‘हिंदु इकोसिस्टम’ या संघटनेने या पुरस्कारांची घोषणा केली आहे. या सर्वांना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
अधिवक्ता मोनिका अरोडा यांनी देहली येथील दंगलींमागील सत्य जगासमोर आणले; अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे महाराष्ट्रात हिंदूंचे धर्मांतर आणि इस्लामी आतंकवाद यांच्या विरोधात कार्य करत आहेत, तर अधिवक्ता अश्विनी दुबे हे पर्यावरण, तसेच अनेक घटनात्मक विषयांवर काम करत आहेत. या सर्वांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना ‘संविधान के रक्षक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.