राजकीय कार्यक्रमांना अनुमती, मग गणेशोत्सवाच्या नियमावलीत कठोरता का ?

पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न

पुणे – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाही अनेक राजकीय लोकांकडून सभा, आंदोलने, उद्घाटन कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांना अनुमती दिली जाते, तर गणेशोत्सवाच्या नियमावलीत कठोरता का ?, असा प्रश्न येथील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित केला आहे. (नियम अथवा कायदा सर्वांसाठी समान असावा हे जनतेलाही वाटते हे प्रशासनाचे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नियमांची कार्यवाही करावी ही अपेक्षा ! – संपादक)

१. गृह विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. यंदाही गणरायाची स्थापना, तसेच विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी असणार आहे. गणेशोत्सव मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करता येणार नाही.

२. गृह विभागाच्या वतीने घोषित केलेल्या नियमावलीवर पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. ‘आता राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नागरिक नियमांचे पालन करत आहेत. गणेशोत्सवात कार्यकर्तेही नियमांचे पालन करतील. त्यामुळे नियमावलीत पालट करावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

३. पुण्यात मानाच्या ५ गणेशोत्सव मंडळांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंडळ, अखिल मंडई मंडळ, भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळ, अशा विविध गणेशोत्सव मंडळांना १२५ वर्षांची परंपरा आहे. अशा गणेशोत्सव मंडळांनी योग्य ती भूमिका घेऊन सरकारकडे मागणी केली पाहिजे, असेही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी म्हटले आहे.