उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. प्रथमेश विष्णु राठीवडेकर एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
२८ जून २०२१ या दिवशी चि. प्रथमेश राठीवडेकर याचा दुसरा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या लेखात सौ. वसुधा राठवडेकर यांना गरोदरपणात झालेला त्रास, आलेल्या अनुभूती आणि बाळाच्या जन्मानंतर तो ३ मासांचा होईपर्यंत जाणवलेली वैशिष्ट्ये पाहिली. आता या भागात प्रथमेशची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली अन्य गुणवैशिष्ट्ये पहाणार आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490609.html |
३. जन्मानंतर
३ आ. वय ४ मास ते १ वर्ष
३ आ १. सात्त्विकतेची ओढ
अ. ‘कुणीही साधक घरी आले, तरी प्रथमेश (बाळाचे नाव प्रथमेश ठेवले आहे.) स्वतःहून त्यांच्याकडे जातो. ‘त्याला साधक आवडतात’, असे मला वाटते.’ – सौ. वसुधा विष्णु राठीवडेकर (चि. प्रथमेशची आई)
आ. ‘प्रथमेश काही मासांचा असतांना मी त्याला म्हणाले, ‘‘सोनू, तू हिंदु राष्ट्रासाठी जन्माला आला आहेस ना ?’’ त्या वेळी त्याने डोळे मिटले आणि उघडले. तेव्हा ‘तो ‘हो’ म्हणाला’, असे मला वाटले.’ – कु. माधुरी दुसे (चि. प्रथमेशची मावशी)
३ आ २. देवाची ओढ
अ. ‘केशवा, माधवा…’ हे भजन आणि ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा…’ हे भक्तीगीत म्हटल्यावर प्रथमेश हुंकार देत असे. जणू काही त्याला त्या भजनांचा अर्थ समजत होता.
आ. आम्ही नामजप करतांना किंवा प्रथमेशला मांडीवर घेऊन नामजप करतांना तो शांतपणे खेळतो किंवा मुद्रा करून शांत रहातो.’
– सौ. सुमन दुसे आणि श्री. दत्तात्रेय दुसे (प्रथमेशचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील)), बडनेरा, अमरावती.
इ. ‘प्रथमेशला ‘श्रीराम’ पुष्कळ आवडतो. श्रीरामाची आरती, नामजप आणि भजने लावल्यावर त्याला पुष्कळ आनंद होतो.
३ आ ३. प्रथमेशची परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याविषयी असलेली ओढ
अ. अन्नप्राशन विधीच्या वेळी पुरोहित वझेकाकांनी सांगितल्यानुसार प्रथमेशसमोर सोने, चांदी, वही, पेन, परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘विकार निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?’, हा ग्रंथ आणि नवीन कापड, अशा वस्तू ठेवल्या होत्या. प्रथमेशने त्यातील केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या ग्रंथाला हात लावला. इतर वस्तूंकडे त्याने लक्ष दिले नाही. तेव्हा पुरोहित वझेकाका म्हणाले, ‘‘बाळ पुष्कळ अंतर्मुख आहे.’’
आ. प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून प्रथमेश ‘बाबा, बाबा’, असे म्हणतो.
इ. २.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘ऑनलाईन’ भावसोहळा आयोजित केला होता. प्रथमेश त्या दिवशी दुपारी २.३० वाजता झोपून लगेच २.४५ वाजता उठला. भावसोहळ्याचा संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तो आनंदी होता.
ई. २.५.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुखपृष्ठावर परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आणि त्यांच्या बाजूला त्यांना नमस्कार करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र होते. त्या वेळी प्रथमेश त्या दोघींच्या छायाचित्राकडे हात दाखवून ‘मां-मां’, असे म्हणत होता.
३ इ. वय १ ते २ वर्षे
३ इ १. खेळकर आणि आनंदी
अ. प्रथमेश झोपेतून उठल्यावर कधीही रडत नाही. तो नेहमीच शांत आणि हसतमुख असतो.
आ. प्रथमेश १७ मासांचा असतांना पहिल्यांदा आम्ही आमच्या गावी (परुळे, वेंगुर्ले) येथे गेलो होतो. तेथे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांकडे गेला.
इ. घरी एका बालदीची कडी निघाली होती. ती कडी घेऊन प्रथमेश ‘धनुष्य बाण’ खेळत असे. ती कडी घेऊन त्याचा दोरा ओढून ‘जय श्रीराम’, असे म्हटल्यावर तो हसतो आणि पुन्हा तसेच करायला सांगतो.’ – सौ. वसुधा विष्णु राठीवडेकर
ई. ‘डिसेंबर २०२० मध्ये आम्ही घरी गेल्यावर सर्वांशी आधीची ओळख असल्याप्रमाणे प्रथमेशचे वागणे होते. त्याला खेळायला कुणी लागत नाही. तो एकटाच बसून खेळतो.
उ. त्याला आमच्या चुलत काकांच्या घरी नेल्यावर ‘हा एवढा आनंदी आणि शांत कसा काय आहे ?’, असे विचारून सर्वांनी त्याचे कौतुक केले.
३ इ २. सहनशील
अ. बाळाला जन्मापासूनच बर्याच वेळा रुग्णालयात भरती करावे लागले. रुग्णालयात भरती केल्यावर तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका त्याला लस द्यायचे. तेव्हा तो तेवढ्यापुरताच रडायचा आणि लगेच शांत व्हायचा. यावरून त्याच्यामध्ये जन्मापासूनच सोशिकपणा असल्याचे लक्षात येते.’- कु. कविता राठीवडेकर (प्रथमेशची आत्या)
आ. ‘प्रथमेश १६ मासांचा असतांना रुग्णाईत झाल्यामुळे त्याला १० दिवस बांबोळी येथील रुग्णालयात भरती केले होते. आरंभी ३ – ४ दिवस तो शुद्धीत नव्हता. त्याच्या मणक्यातून पाणी घेऊन त्याच्या पुष्कळ तपासण्या केल्या होत्या, तरीही तो शांत होता. थोडे बरे वाटू लागल्यावर प्रथमेश त्याला पडताळायला येणार्या तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्याशी हसून खेळायचा.
३ इ ३. परिस्थिती स्वीकारणे : प्रथमेश १८ मासांचा असतांना आम्ही अमरावती येथे माझ्या माहेरी गेलो होतो. तिथे गेल्यावर मी आणि त्याचे बाबा आधुनिक वैद्यांकडे गेलो होतो. तेव्हा प्रथमेश त्याच्या आजी-आजोबांच्या (माझ्या आई-बाबांपाशी) जवळ राहिला होता. त्या २ – ३ घंट्यांमध्ये त्याने एकदाही आमची आठवण काढली नाही किंवा तो रडला नाही. यावरून ‘तो परिस्थिती स्वीकारतो’, असे माझ्या लक्षात आले.
३ इ ४. देवाप्रती ओढ दर्शवणार्या गोष्टी
अ. प्रथमेश पहिल्यांदा ‘बाप्पा’ हा शब्द बोलायला शिकला.’ – सौ. वसुधा विष्णु राठीवडेकर
आ. ‘आम्ही (मी, माझी बहीण आणि प्रथमेश) बडनेरा, अमरावती येथे घरी गेलो होतो. त्या वेळी प्रथमेश प्रतिदिन सायंकाळी ६.३० वाजता आम्हाला आरतीची वेळ झाल्याची आठवण करून देऊन आरती लावायला सांगत असे.’ – कु. माधुरी दुसे
इ. ‘तो श्रीकृष्णाच्या छायाचित्राकडे पाहून हसतो. पंखा फिरत असतांना प्रथमेशला ‘श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र फिरत आहे’, असे म्हटल्यावर तो पंख्याकडे बघून हसत असे.’- सौ. सुमन दुसे आणि श्री. दत्तात्रेय दुसे
३ इ ५. गुरुंविषयीची ओढ दर्शवणार्या कृती
अ. ‘प्रथमेश ‘आई’ हा शब्द पूर्ण म्हणत नाही. त्याला ‘आ’ म्हणता येते, तरी तो त्याच्या आईला ‘ई’ म्हणून हाक मारतो. ‘आई म्हण’, असे म्हटले, तरी हसून पुन्हा तो ‘ई’च म्हणतो. तेव्हा तो ताईला ‘ईश्वराकडे चल’, असे सांगत आहे’, असे मला असे वाटले.
आ. एका भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई बोलत असतांना प्रथमेश ‘मां’, असे म्हणून हसत होता.’ – कु. माधुरी दुसे
ई. त्याला ‘गुरु हमारे धन दौलत है ।’ हे भजन पुष्कळ आवडते. तो रडत असतांना हे भजन लावल्यावर तो शांत होतो.’ – सौ. वसुधा विष्णु राठीवडेकर
४. अनुभूती
अ. ‘प्रथमेशला झोपवण्यासाठी मांडीवर घेतल्यावर माझा नामजप आपोआप चालू होत असे.’ – सौ. सुमन दुसे आणि श्री. दत्तात्रेय दुसे
आ. ‘प्रथमेश ७ मासांचा होईपर्यंत दिवसभर झोपत असे आणि रात्रभर जागत असे. एकदा रात्री प्रथमेश पुष्कळ रडत होता. तेव्हा आम्ही (मी आणि प्रथमेशचे बाबा यांनी) ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’ असा मोठ्याने नामजप केला. तेव्हा तो शांत झाला. त्या दिवशी प्रथमच तो रात्रभर शांत झोपला. त्यानंतर त्याचे रात्रभर जागण्याचे प्रमाण उणावले.
५. स्वभावदोष : हट्टीपणा’
– सौ. वसुधा विष्णु राठीवडेकर
(समाप्त )
|