अलिबाग जिल्हा रुग्णालयातील आधुनिक वैद्यास धक्काबुक्की !

आरोपीला अटक न झाल्यास सामूहिक सुट्टीची आधुनिक वैद्यांची चेतावणी

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे निवेदन देताना आधुनिक वैद्य

रायगड – कोरोना रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना केंद्रामध्ये एका आधुनिक वैद्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणार्‍या आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी आधुनिक वैद्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

या रुग्णालयात कोरोनाबाधित प्रशांत पाटील यांच्यावर उपचार चालू होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर प्रशांत पाटील यांच्या जवळचे मित्र महेश पाटील यांनी रात्री १२ वाजता रुग्णालयात जाऊन तेथील आधुनिक वैद्य पडोळे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी गुन्हा नोंद करूनही आरोपीला अटक केली जात नसल्याने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन ‘महेश पाटील याला त्वरित अटक करावी, कोरोना रुग्णालयात कडक सुरक्षायंत्रणा द्यावी, अन्यथा सर्व वैद्य सामूहिक सुट्टी घेतील’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.