‘साधना करायला लागल्यापासून व्यष्टी साधनेचा आढावा देणे आणि समष्टी सेवा करणे, असे प्रयत्न देवच माझ्याकडून करवून घेत होता. देवाच्या कृपेने अनेक वेळा मला सद्गुरु आणि संतांचे सत्संगही लाभत होते; पण माझ्यातील अहं आणि अयोग्य दृष्टीकोन यांमुळे मी याचा अपेक्षित असा लाभ करून घ्यायला अल्प पडत होते. त्या वेळी माझे कुठे चुकते, हे सद्गुरूंनी सांगूनही माझ्या लक्षात येत नव्हते.
२. सौ. राजहंसकाकूंनी व्यष्टी आढाव्यात सांगितलेली सूत्रे आरंभी लक्षात न येणे
वर्ष २०१७ मध्ये आम्ही डोंबिवली येथून गोवा येथे रहायला आलो. तेव्हापासून सौ. वैशाली राजहंसकाकू माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. आढावा सत्संगामध्ये काकू काही सूत्रे सांगायच्या; पण आरंभीच्या काळात मला त्यातील काही कळायचे नाही.
३. काकूंनी सत्संगात सांगितल्याप्रमाणे कृती केल्यावर यजमान आणि मुले यांच्याविषयी असलेल्या अपेक्षा न्यून होऊन नामजपाची आठवण होऊ लागणे
यजमान आणि मुले यांच्याकडून माझ्या पुष्कळ अपेक्षा असायच्या. ‘ते सगळे साधक आहेत; म्हणून त्यांनी मला समजून घ्यायला हवे’, असे मला वाटायचे. यावर काकूंनी सांगितले, ‘‘काही गोष्टी घरच्यांच्या लक्षात येत नाहीत. आपण त्यांना त्याविषयी सांगणे अपेक्षित असते. आपण ‘त्यांना कशा पद्धतीने सांगतो आणि सांगतांना आपली किती शरणागती असते’, याचाही आपण विचार करायला हवा. ‘ते कोणती सेवा चांगल्या प्रकारे करू शकतील’, याचा त्यांच्या स्थितीला जाऊन विचार करून मगच त्यांना आपण सेवा सांगायला हवी.’’ त्यानुसार मी प्रयत्न केल्यावर यजमान आणि मुले यांच्याविषयी अपेक्षेचे विचार थांबले अन् मला नामजपाची आठवण व्हायला लागली. ‘माझा नामजप सतत चालू आहे ना ?’, याकडे लक्ष देण्याचा मी प्रयत्न केला.
४. काकूंनी सांगितल्याप्रमाणे यजमानांशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे मनाचा संघर्ष न्यून होऊन प्रत्येक प्रसंगाकडे आध्यात्मिकदृष्ट्या पहाता येणे
‘यजमानांशी बोलतांना काही प्रसंगांत माझ्या मनाचा संघर्ष होतो’, याविषयी मी काकूंना एकदा सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘त्या प्रसंगात ‘तुमचे काय चुकले ?’, याचा तुम्ही अभ्यास केला का ?’’ त्यांनी मला मनाचा नीट अभ्यास करायला सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘आपण सांगितल्याविना समोरच्याला आपल्या मनातील काही कळू शकत नाही. त्यामुळे आपण मनमोकळेपणाने आणि निरपेक्षपणे सगळे सांगायला हवे.’’ काकूंनी याची जाणीव करून दिल्यानंतर माझ्याकडून त्या प्रसंगांकडे आध्यात्मिकदृष्ट्या पहाण्याचे प्रयत्न हळूहळू व्हायला लागले.
५. एका संतांनी सांगितल्याप्रमाणे ‘घरात भांडण झाल्यास त्या गोष्टीचे चिंतन करून अंतर्मुख होऊन एकमेकांचे गुण बघायला शिकून ते स्वतःमध्ये आणण्यासाठी प्रयत्न कसा करायचा ?’, हे काकूंनी शिकवणे
वर्ष २०१७ मध्ये आम्ही गोव्यात आल्यानंतर आम्हाला येथील एका संतांचा सत्संग लाभला. त्या वेळी यजमानांनी संतांना सांगितले, ‘‘आम्ही एकमेकांच्या स्वभावदोषांवरून भांडतो.’’ हे ऐकून ते संत म्हणाले, ‘‘छान आहे. असेच भांडा आणि प्रारब्ध लवकर संपवा.’’ त्या वेळी त्यांच्या त्या वाक्याचा आम्हाला भावार्थ कळला नाही. वर्ष २०२१ मध्ये व्यष्टी आढाव्यात काकू म्हणाल्या, ‘‘भांडण झाल्यानंतर चिंतन करून आणि अंतर्मुुख होऊन एकमेकांचे गुण बघायला शिका अन् ते स्वतःमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा, असे त्या संतांना तुम्हाला सांगायचे होते.’’ आढाव्यामध्ये काकूंनी व्यवहार आणि साधना यांतील प्रत्येक गोष्टीकडे आध्यात्मिकदृष्ट्या बघायला शिकवल्यानेच आम्हाला हा भावार्थ समजला. ‘प्रत्येक गोष्ट आपल्यावरच अवलंबून असते’, याची काकू आम्हाला नेहमी जाणीव करून देतात. त्यामुळेच घरातील प्रसंगांत मनापासून माघार घेणे, स्वतःला पालटण्याचे प्रयत्न करणे इत्यादी प्रयत्न माझ्याकडून व्हायला लागले आणि मला यजमानांचे गुण लक्षात यायला लागले.
६. आढाव्यातील साधकांना प्रोत्साहन देणे, इतरांचे कौतुक करून त्यांना महत्त्व देणे, हे गुण काकूंकडून शिकायला मिळणे
आढाव्यातील साधकांनी थोडेसे प्रयत्न केले, तरी काकू सत्संगामध्ये त्यांचे पुष्कळ कौतुक करतात. ‘‘तुम्हाला एवढे जमले ना, आता पुढचे जमणारच आहे’’, असे सांगून त्या नेहमी सगळ्यांना प्रोत्साहन देतात. ‘इतरांचे कौतुक करणे आणि त्यांना महत्त्व देणे’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. ‘साधक चांगले प्रयत्न करत आहेत, तर ते अजून चांगले कसे करू शकतील ? प्रयत्नांमधील त्यांचा उत्साह कसा टिकून राहील ?’, याविषयी त्यांची तीव्र तळमळ असते. त्या नेहमीच उत्साही असतात. त्यांच्या आवाजामध्ये एवढा उत्साह असतो की, ‘एखादी व्यक्ती काहीच न करणारी असली, तरी त्यांचे बोलणे ऐकून ती काहीतरी प्रयत्न करायला लागेल.
अजूनही मी प्रयत्न करण्यात पुष्कळ अल्प पडते; पण देवाच्या कृपेने ‘आता प्रत्येक गोष्टीकडे साधनेच्या दृष्टीने कसे पहायचे ?’, हे मला कळायला लागले आहे.
‘देवा, तुझ्या कृपेने मला काकूंकडून हे सर्व शिकता आले, ते तुझ्या चरणी अर्पण करते.’
– सौ. ज्योत्स्ना जगताप, फोंडा, गोवा. (१३.४.२०२१)